- रोहित नाईक
मुंबई : ‘कोरोनामुळे आता क्रीडाविश्वातही खूप मोठे बदल होण्याची शक्यता आहे. नुकताच ‘आयटीटीएफ’च्या झालेल्या वेबिनारमध्ये मी सहभागी झालो होतो. तेव्हा काही महत्त्वपूर्ण निर्णयांवर विचार झाला. यानुसार प्रत्येक सामन्यादरम्यान प्रत्येक खेळाडूंना चेंडूंचा एक स्वतंत्र सेट देण्यात येईल आणि प्रत्येक रॅली नव्या चेंडूने खेळविण्यात येऊ शकते. अजून यावर अंतिम निर्णय झालेला नाही, पण असे होऊ शकते,’ अशी माहिती भारताचा युवा टेबल टेनिसपटू मुदित दानी याने ‘लोकमत’ला दिली.सध्या प्रत्येक खेळाच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संघटनांच्या आॅनलाईन बैठका पार पडत आहेत. यातूनच भविष्यातील वाटचालीविषयी काही निर्णय घेण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस संघटनेनेही (आयटीटीएफ) नुकतीच आपल्या खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांची आॅनलाईन बैठक घेतली. भविष्यात प्रत्येक खेळाडूला स्वतंत्र चेंडू पुरविण्याचा विचार आयटीटीएफ करत आहे. याविषयी २१ वर्षीय मुंबईकर मुदितने म्हटले की, ‘आयटीटीएफ सध्या प्रत्येक स्पर्धेदरम्यान अनेक चेंडू खेळविण्याचा विचार करत आहे. यानुसार प्रत्येक रॅलीमध्ये नवा चेंडू खेळविण्यात येईल. शिवाय प्रत्येक खेळाडूला त्याचा स्वतंत्र चेंडूंचा सेटही पुरविण्यात येईल आणि प्रत्येक गेमनंतर सर्व चेंडू सॅनिटाइझरने स्वच्छही केले जातील. त्याचप्रमाणे खेळाडूंना सर्वे दरम्यान एका हातात ग्लोव्हज् घालण्याची सूचनाही करण्यात आली आहे.जर हे सर्व प्रत्यक्षात आणले, तर नक्कीच हे बदल थोडेफार आव्हानात्मक राहील. कारण सॅनिटाईझ केलेल्या चेंडूंवरील रसायनामुळे चेंडंूच्या हालचालीमध्ये काही प्रमाणात फरक नक्कीच पडेल. असे अनेक बदल इतर खेळांमध्येही घडतील आणि यासाठी आपल्याला सज्ज राहावे लागेल.’ गेल्या वर्षभरात मुदित दमदार फॉर्ममध्ये होता. तो भारतीय संघाच्या उंबरठ्यावरही पोहोचला आहे. मात्र लॉकडाऊनमुळे आता त्याला अधिक मेहनत घ्यावी लागेल. याविषयी तो म्हणाला की, ‘२०१९ सालचा मोसम माझ्यासाठी शानदार ठरला. वरिष्ठ पातळीवर खेळताना मी माझी छाप पाडण्यात यशस्वी ठरलो. पण आता कोरोनामुळे आव्हाने वाढली आहेत.- आॅगस्ट २०१८ साली वरिष्ठ पातळीवर पदार्पण केलेल्या मुदितने जागतिक क्रमवारीत ७७४व्या क्रमांकावरून सुरुवात केली. मात्र यानंतर कमालीचा खेळ करताना केवळ २० महिन्यात अव्वल २०० खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. २०१९मध्ये त्याने यूएस ओपनमध्ये दुहेरीत पदक मिळवले. वरिष्ठ पातळीवर हे त्याचे पहिले पदक ठरले होते.