टेनॉर कंपनीने आपला डी २ हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये लाँच केला असून या अल्प मूल्याच्या मॉडेलमध्ये बर्यापैकी फिचर्स आहेत.
टेनॉर ( याचे स्पेलिंग 10.or असे असून उच्चार Tenor टेनॉर असा आहे.) कंपनीने गत वर्षी भारतात पदार्पण केले. या कंपनीने आजवर टेनॉर जी, टेनॉर डी आणि टेनॉर ई असे तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. यात आता टेनॉर डी २ या मॉडेलची भर पडणार आहे. नावातच नमूद असल्यानुसार हे आधीच्या अर्थात टेनॉर डी या मॉडेलची नवीन आवृत्ती आहे. याला २ जीबी रॅम व १६ जीबी स्टोअरेज आणि ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. यांचे मूल्य अनुक्रमे ६,९९९ आणि ७,९९९ रूपये आहे. हे दोन्ही व्हेरियंट २७ ऑगस्टपासून ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. यासोबत रिलायन्स जिओची २२०० रूपयांची कॅशबॅक योजना ग्राहकांना मिळणार आहे. तर पीएनबी व इंडसइंड बँकेच्या क्रेडीट व डेबीट कार्डवरून याची खरेदी करणार्या ग्राहकाला १० टक्के कॅशबॅक मिळणार आहे. याला नो-कॉस्ट इएमआयच्या माध्यमातून खरेदी करता येणार असून अमेझॉन प्राईमच्या ग्राहकांना अतिरिक्त एक वर्षाची वॉरंटी मिळणार आहे.
टेनॉर डी २ या मॉडेलमध्ये ५.४५ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १४४० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा एलटीपीएस या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे अस्पेक्ट रेशो १८:९ असा आहे. यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा दिलेला आहे. यामध्ये सिंगल टोन एलईडी फ्लॅश, पीडीएएफ, एफ/२.० अपर्चर आदी फिचर्स आहेत. विशेष म्हणजे यात एचडीआर तंत्रज्ञानाचा सपोर्ट दिलेला आहे. तर यामध्ये ब्युटिफाय, पॅनोरामा आदी फिचर्स दिलेले आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये सेल्फी काऊंटडाऊन, ब्युटिफाय आणि फेस डिटेक्शन हे फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये ३२०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो ८.१ या आवृत्तीवर चालणारे आहे.