सध्या ऑनलाईन शॉपिंगचा जमाना आहे. तसाच ऑनलाईन फ्रॉडचासुद्धा आहे. अनेकदा ऑनलाईन वस्तू मागविली की त्याऐवजी विटा, दगड आदी देखील येतात. मग या कंपन्या हात वर करतात. आपली फसवणूक होते, असे प्रकार सर्रास घडतात. परंतू, डिस्काऊंटमुळे प्रत्येकजण आज ही रिस्क घेत आहे.
अनेक प्रकार असे असतात, तुम्ही ऑनलाईन आर्डर केली, पैसे दिले तरी ती वस्तू तुमच्यापर्यंत येत नाही. असा प्रकार फ्लिपकार्टने केला होता, जो आता त्यांना चांगलाच महागात पडला आहे. बंगळुरुच्या महिलेला आता फ्लिपकार्ट जवळपास चौपट पैसे देणार आहे.
महिलेने फ्लिपकार्टवरून 12,499 रुपयांचा मोबाईल मागविला होता. परंतू तिला डिलिव्हरच केला गेला नाही. तिने फ्लिपकार्टला अनेकदा संपर्क केला, परंतू त्यांच्याकडूनही नीट उत्तरे मिळाली नाहीत. यामुळे या महिलेने ग्राहक तक्रार निवारण केंद्रात धाव घेतली आणि फ्लिपकार्टविरोधात तक्रार दाखल केली.
ग्राहक न्यायालयाने यावर आता निर्णय दिला आहे. महिलेने दिलेले मोबाईलचे 12,499 रुपये तिला परत करावेत. तसेच यावर वार्षिक १२ टक्के व्याज द्यावे असे आदेश कोर्टाने दिले आहेत. याचबरोबर कंपनीला कोर्टाने २० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. तसेच महिलेला कायदेशीर खर्चापोटी १० हजार रुपये देण्यास सांगितले आहेत. अशाप्रकारे फ्लिपकार्टला ४२ हजार रुपये द्यावे लागणार आहेत.
फ्लिपकार्टने सेवेच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवला असून अनैतिक पद्धतींचे पालन केले आहे, असे बेंगळुरू ग्राहक न्यायालयाने म्हटले आहे. महिलेने ईएमआयवर हा फोन घेतला होता. यामुळे तिला ईएमआयचे पैसे भरावे लागले आहेत. महिलेला मानसिक त्रास झाला आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.