मुंबई : तंत्रकौशल्यात भारत एकीकडे उंच भरारी घेत असताना, डिसेंबर महिन्यात मात्र देशभरातील मोबाइल वापरकर्त्यांत १.२८ कोटींची घट नोंदविण्यात आली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२१ मधील मोबाइल वापरकर्त्यांची तुलनात्मक आकडेवारी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नुकतीच सादर केली. त्यातून ही माहिती समोर आली आहे.
ट्रायच्या आकडेवारीनुसार, दूरसंचार क्षेत्रात वरचा क्रमांक असलेल्या जिओने डिसेंबर महिन्यात सर्वाधिक ग्राहक गमावले आहेत. जिओने गमावले सर्वाधिक ग्राहक गमावले आहेत.
बीएसएनएल, एअरटेलची चांदी
अन्य दूरसंचार कंपन्यांचे ग्राहक कमी झाले असले तरी एअरटेल आणि बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. डिसेंबरमध्ये एअरटेलने चार लाख ७५ हजार नवे ग्राहक जोडले. त्यामुळे त्यांची एकूण ग्राहकसंख्या ३६.५७ कोटींवर पोहोचली आहे. बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येतही या महिन्यात ४७ हजारांची भर पडली.
कारणे काय?सर्वच खासगी दूरसंचार कंपन्यांनी नोव्हेंबरमध्ये रिचार्जचे दर जवळपास १८ ते २५ टक्क्यांनी वाढवले. त्यामुळे ग्राहकांनी किफायतशीर सेवाप्रदाता शोधण्यास सुरुवात केली. दुसरीकडे सेवेचा दर्जा टिकवण्यात काही दूरसंचार कंपन्यांची पीछेहाट झाल्यामुळे ग्राहकांनी पाठ फिरवली. मुंबईसारख्या महानगरातही ग्राहकांना नेटवर्कशी संबंधित समस्या जाणवू लागल्याने त्यांनी अन्य पर्याय शोधला.