भारतातील लहान मुलं आणि तरुण ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात अडकत आहेत. स्वस्त डेटा आणि स्मार्टफोन्स यामुळे हा विळखा अधिकाधिक घट्ट होत असल्याचे दिसत आहे. या ऑनलाईन गेम्सच्या नादात भांडण, खून आणि आत्महत्या झाल्याच्या बातम्या येत असतात. अशीच एक बातमी मध्यप्रदेशमधून आली आहे. मध्यप्रदेशमधील छतरपुर इथल्या एका 13 वर्षीय मुलाने Free Fire गेममध्ये 40,000 रुपये गमावले आणि त्यामुळे भीती आणि नैराश्यामुळे त्या मुलाने आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये Sorry Mummy लिहून आपल्या आईची माफी मागितली आहे. (Class 6 student dies by suicide after losing Rs. 40,000 in online game)
मध्यप्रदेशमधील छतरपुर शहरातील कृष्णा पाण्डेय या मुलाने आत्महत्या केली आहे. कृष्णा 13 वर्षाचा होता आणि तो सहावीत शिकत होता. ऑनलाईन मोबाईल गेम Garena Free Fire मध्ये 40,000 रुपये गमावल्यानंतर कृष्णाने आत्महत्या केली आहे. फ्री फायर गेममधील टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्याने हे पैसे खर्च केले होते. कृष्णाचे वडील एक पॅथॉलॉजी लॅब चालवतात तर आई जिल्हापरिषदेच्या दवाखान्यात काम करते.
काही दिवसांपूर्वी कृष्णाच्या आईला बँकेच्या खात्यातून 1,500 रुपये कट झाल्याचा मेसेज आला होता. याची विचारणा केल्यावर कृष्णाने आपण ओनलाईन गेमसाठी पैसे काढल्याचे सांगितले. त्यानंतर त्याची आई त्याला ओरडली म्हणून तो आपल्या खोलीत गेला आणि दरवाजा बंद करून घेतला. बराच काळ दरवाजा न उघडल्यामुळे त्याच्या बहिणीने आई-वडिलांना बोलवले आणि त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला.खोलीत कृष्णाचे शरीर फासावर लटकल्याचे आढळले. कृष्णाने ओढणी पंख्याला बांधून फास लावून घेतला होता आणि त्याचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोलिसांनी येऊन तपासाला सुरुवात केली.
सुसाईड नोटमध्ये लिहिले ‘I am Sorry Mummy’
आत्महत्या करण्यापूर्वी कृष्णाने सुसाइड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये त्याने आपण कुठे आणि किती पैसे खर्च केल्याची माहिती दिली होती. आपल्याला नैराश्य आल्याची कबुली कृष्णाने या सुसाईड नोटमध्ये दिली होती. 13 वर्षीय कृष्णाने लिहिले आहे कि त्याने ऑनलाइन मोबाईल गेम Garena Free Fire मध्ये 40,000 रुपये खर्च केले होते. गेममध्ये पैसे गमवल्यामुळे तो डिप्रेशनमध्ये आहे आणि म्हणून तो आत्महत्या करत आहे. इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषेत लिहिलेल्या या नोटमध्ये त्याने आपल्या पालकांची माफी मागितली असून रडू नका असे म्हटले आहे. कृष्णाने आपला सुसाइड नोटची सुरवातच ‘I am Sorry Mummy’ ने केली आहे.