Appleचे iPhone सर्वात महाग मोबाईलपैकी एक आहेत. आयफोनच्या काही मॉडेल्सच्या किमती तर लाखात आहेत. पण, एखादा मोबाईल जुना झाला, तर त्याला फार किंमत मिळत नाही. याउलट अॅपलच्या एका 15 वर्षे जुन्या iPhone ची तब्बल 28 लाख रुपयांना विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण विक्री झालेला आयफोन 2007 मध्ये बाजारात आलेला पहिल्या सीरिजमधला सीलबंद फोन आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयफोनचे हे मॉडेल अमेरिकेत एका लिलावादरम्यान 35000 डॉलर (जवळपास 28 लाख रुपये) मध्ये विकले गेले आहे. 9 जानेवारी 2007 रोजी अॅपलचे सीईओ स्टीव्ह जॉब्स यांनी सॅन फ्रान्सिस्को येथील मॅकवर्ल्ड कन्व्हेन्शनमध्ये अॅपल आयफोनचे अनावरण केले होते. हा एक टच स्क्रीन फोन होता, ज्यात कॅमेरा, आयपॉड आणि वेब-ब्राउझिंगसारखे फीचर्स होते. हा लिलाव करण्यात आलेला फोन, तेव्हापासून सीलबंद करुन ठेवण्यात आला होता. त्याचा आता इतक्या वर्षानंतर लिलाव करण्यात आला.
अॅपल आयफोनच्या या मॉडेलमध्ये टचस्क्रीन आणि 2-मेगापिक्सलचा कॅमेरा होता. यासोबत वेब ब्राउझर आणि व्हिज्युअल व्हॉइसमेलची सुविधाही यात देण्यात आली होती. हा आयफोन यूएस मध्ये जून 2007 मध्ये $ 499 च्या किंमतीवर रिलीज झाला होता. या जुन्या iPhone मॉडेलचा व्हिन्टेज फोन म्हणून लिलाव करण्यात आला, ज्यात 28 लाखांची बोली लागली. दरम्यान, हा फोन कोणी घेतला, याबाबत माहिती समोर आलेली नाही. विशेष म्हणजे, पुढच्या महिन्यात iPhone 14 सीरीज लॉन्च होणार आहे.