माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आक्षेपार्ह मजकूरावर मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी यापूर्वी यांना इशाराही दिला होता. आता यानंतर आक्षेपार्ह मजकुराच्या पार्श्वभूमीवर १८ ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्यात आले आहेत. देशभरात १९ वेबसाइट, १० ॲप्स आणि ५७ सोशल मीडिया हँडल्सवर बंदी घालण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ आणि ६७ए, आयपीसीच्या कलम २९२ आणि इनडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ वूमन (प्रोहिबिशन) कायदा, १९८६ च्या कलम ४ च्या उल्लंघनानंतर ही कारवाई करण्यात आली.
माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या तरतुदींनुसार भारत सरकारच्या संबंधित मंत्रालये/विभाग आणि माध्यम, मनोरंजन, महिला हक्क आणि बाल हक्क क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय अंमलात आणण्यात आलाय. अनुराग ठाकूर यांनी वारंवार प्लॅटफॉर्म्सना त्यांच्या जबाबदाऱ्या समजून घेण्याचा आणि अश्लील, आक्षेपार्ह सामग्रीचा प्रचार न करण्याची ताकीद दिली होती. १८ ओटीटी प्लॅटफॉर्म्सद्वारे असा मजकूर दाखवला जात असल्याचं अनुराग ठाकूर यांनी १२ मार्च रोजी म्हटलं होतं.
कोणत्या OTT प्लॅटफॉर्म्सवर कारवाई?
ड्रीम्स फिल्म्स, नियॉन एक्स व्हीआईपी, मूड एक्स, वूवी, बेशर्म्स, मोजफ्लिक्स, येस्मा, हंटर्स, हॉट शॉट्स व्हीआईपी, अनकट अड्डा, रॅबिट, फूजी, ट्राई फ्लिक्स, एक्ट्रामूड, चीकूफ्लिक्स, एक्स प्राइम, नियूफ्लिक्स आणि प्राइम प्ले यावर कारवाई करण्यात आली आहे.