लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात ५जी दूरसंचार सेवा सुरू होण्यापूर्वीच ४जी सेवेचे दर वाढू शकतात. क्रिसिल रेटिंग्ज, नोमुरा आणि गोल्डमॅन सॅक्सच्या अनुमानानुसार, २०२२ मध्ये दूरसंचार कंपन्या ३० टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याची शक्यता आहे.
सोमवारी ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव पूर्ण झाला. १.५ लाख कोटी रुपयांची बोली कंपन्यांनी लावली. ही माेठी गुंतवणूक लक्षात घेता कंपन्या ५जी सेवेचे दर वाढीव ठेवतील, असा अंदाज आहे. क्रिसिलने म्हटले की, लोकांनी ५जी सेवेचा स्वीकार करावा यासाठी कंपन्या ४जी सेवेचे दर वाढविण्याची शक्यता आहे. सध्या कंपन्या देत असलेल्या ४जीच्या १.५ जीबी प्रतिदिन डाटा प्लॅनच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ केली जाऊ शकते.
५जी सेवेसाठी कंपन्यांना मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. ५जी सेवेसाठी दूरसंचार कंपन्या ७०० मेगाहर्ट्जच्या स्पेक्ट्रमला प्राधान्य देत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे हे स्पेक्ट्रम हाय फ्रिक्वेन्सीमध्ये येते. त्यासाठी कंपन्यांना टॉवरांची संख्या कमी ठेवली तरी चालेल. त्यामुळे कंपन्यांचा पायाभूत सुविधांवरील खर्च मर्यादित राहण्यास मदत होईल.
१५ हजारांचा स्मार्टफोेन आहे?
सुरुवातीला कंपन्या प्रीमियम ग्राहकांना म्हणजेच १५ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे स्मार्टफोन ज्यांच्याकडे आहेत त्यांनाच ५जी सेवा देतील, असा अंदाज आहे.
५जी कधी येणार?
एका अंदाजानुसार, आगामी १० ते १५ दिवसांत कंपन्यांना ५जी स्पेक्ट्रमचे वितरण होईल. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत वा वर्षाच्या अखेरपर्यंत औद्योगिक व व्यावसायिकांसारख्या निवडक वापरकर्त्यांना ५जी सेवा उपलब्ध होईल. सर्वसामान्य लोकांपर्यंत ५जी सेवा पोहोचायला मात्र २ ते ३ वर्षे लागतील.
कधी होणार दरवाढ?
गोल्डमॅन सॅक्सने म्हटले आहे की, आमच्या अंदाजानुसार २०२२ च्या अखेरपर्यंत दूरसंचार कंपन्या पुन्हा एकदा दरवाढ करतील. हा या क्षेत्रातील उत्पन्नवृद्धीचा पुढील टप्पा असेल, असे आम्हाला वाटते. ५जी स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओने सर्वाधिक बोली लावली आहे. त्यामुळे कंपनी येणाऱ्या ५जी सेवेत सर्वाधिक मजबूत स्थितीत आहे.