नवी दिल्ली : देशात 5G लाँच करण्यात आले आहे. आता काही मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा देण्याची तयारी सुरू आहे. याबाबत दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भाष्य केले आहे. 2023 पर्यंत देशातील 80 ते 90 टक्के शहरांमध्ये 5G सेवा सुरू होईल, असे अश्विनी वैष्णव म्हणाले. दरम्यान, सरकारने येत्या 500 दिवसांत देशभरात 25,000 दूरसंचार टॉवर बसवण्यास मंजुरी दिली आहे.
दूरसंचार टॉवर उभारण्यासाठी जवळपास 26,000 कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. तसेच, या निर्णयामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांनाही 5G सुविधेचा लाभ मिळेल. हे देशातील सर्वात दुर्गम भागांना इंटरनेटशी जोडेल आणि डिजिटल क्रांती घडवून आणेल, असे अश्विनी वैष्णव यांचे म्हणणे आहे. तर टॉवर उभारण्यासाठी सरकार युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड वापरणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, टॉवर्स बसवण्यासाठी सरकारी मालकीच्या भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेडचा (BBNL) वापर केला जाईल. डिजिटल इंडिया प्रेस कॉन्फरन्स आयटी मंत्र्यांच्या कार्यक्रमात बोलताना अश्विनी वैष्णव यांनी पीएम गति शक्तीमध्ये सामील होण्याबद्दल सांगितले होते. याअंतर्गत देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश करण्यात आला आहे. गती शक्ती योजना हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये रेल्वे आणि रोडवेशी संबंधित एकूण 16 मंत्रालयांचा समावेश आहे. या अंतर्गत सर्वजण मिळून योजना आखतात आणि त्यावर सहमती दर्शवतात.
कार्यक्रमादरम्यान अश्विनी वैष्णव यांनी सबका साथ, सबका विकास यावर भर दिला आणि सांगितले की, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश डिजिटल इंडियाला उच्च पातळीवर नेण्यासाठी, आत्मनिर्भर भारताची स्वप्ने साकार करण्यासाठी आणि एक ट्रिलियन डॉलरची डिजिटल अर्थव्यवस्था करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. विशेष म्हणजे, दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी सांगितले होते की, सरकार संपूर्ण भारतात 5G तंत्रज्ञानासाठी 100 प्रयोगशाळा स्थापन करण्याचा विचार करत आहे आणि त्यापैकी किमान 12 प्रयोगशाळांचा वापर विद्यार्थ्यांसाठी चाचण्या आणि प्रयोग करण्यासाठी केला जाईल.