सध्याचं युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. यामुळे आपल्याला आता घर बसल्या वस्तु खरेदी करता येतात, ई-कॉमर्सच्या अनेक कंपन्या मार्केटमध्ये आहेत. यामुळे आता ग्रामीण भागातीलही ग्राहक ऑनलाईन खरेदी करतात. पण, यात जवेढा फायदा आहे तेवढा तोटाही आहे. फसवणूकीच्याही घटना समोर आल्या आहेत. सध्या अशाच एका फसवणुकीची घटना समोर आली आहे. तब्बल ८ लाख रुपये खात्यावरुन गायब झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.
सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी आणि पैसे लुटण्याचे नवीन मार्ग शोधत आहेत. यूपीआय ते एसएमएस फसवणुकीची प्रकरणे समोर आली आहेत. नुकतेच ऑनलाइन टॉवेल ऑर्डर करताना एका वृद्ध महिलेची फसवणूक करून ८.३ लाखांची फसवणूक झाली. या ऑनलाइन घोटाळ्याने लोकांना हादरवले आहे.
एका ७० वर्षीय महिलेने एका ई-कॉमर्स साइटवरून १,१६० रुपयांना ऑनलाइन सहा टॉवेल ऑर्डर केले. पण, ऑनलाइन पेमेंट करताना त्यांच्या खात्यातून १,१६९ रुपयांऐवजी १९,००५ रुपये गेले. चुकीच्या व्यवहाराची तक्रार करण्यासाठी, महिलेने संपर्क क्रमांक पाहिला आणि मदतीसाठी बँकेच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल केला पण बँकेशी संपर्क होऊ शकला नाही.
काही वेळातच, त्या महिलेला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला, जो बँकेचा असल्याचा दावा करत होता आणि अलीकडील ऑनलाइन व्यवहाराच्या समस्येसाठी त्यांना मदत करण्यासाठी सांगितले. त्या व्यक्तीने त्यांना रिफंडसाठी अॅप डाउनलोड करण्यास सांगितले.
महिलेने मदत मिळवण्यासाठी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले पण त्यांच्या खात्यातून एक लाख रुपये गेले. अवैध व्यवहार पाहून महिलेने पोलीस ठाणे गाठले. मात्र, वेळ झाला होता. सुमारे ८.३ लाख रुपये काढण्यात आले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.