- विनय उपासनी (मुख्य उपसंपादक, लोकमत, मुंबई)
अलीकडच्या काळात अनेक नवीन शब्द, नव्या संकल्पना वेगाने चर्चेत आणि प्रत्यक्ष वापरात येतात. अशा काही नव्या संकल्पनांचे संदर्भासह स्पष्टीकरण करणाऱ्या या नव्याकोऱ्या लेखमालेतला पहिला शब्द : चॅट जीपीटी! विचार करा, तुम्हाला तुमच्या सहकाऱ्याचे कौतुक करणारे एक पत्र लिहायचे आहे किंवा त्याच्यावर एक कविता करायची आहे, पण तुम्हाला शब्द सुचत नाहीयेत. तुम्ही काय कराल? अर्थातच एखाद्या लेखक किंवा कवीमित्राला गळ घालाल. मात्र, आता तसे काही करण्याची गरज नाही. एका क्लिकवर पत्र, कविता, कथा, एवढेच काय ऑफिशिअल मेलही तुम्हाला तयार करून मिळेल. - कुठे? चॅट जीपीटीवर...!
चॅट जीपीटी हे गुगललाही मात देऊ शकेल असे नवे तंत्रज्ञान आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटिलिजन्स) वापर करून तयार करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानाची गंमत अशी की, यात तुम्हाला हव्या असलेल्या विषयाची संपूर्ण माहिती संगणकाच्या पडद्यावर झळकते. तुम्ही प्रश्न विचारा. त्याची अचूक उत्तरे चॅट जीपीटी तुमच्यासमोर सादर करते. अगदी त्या विषयाचा तपशील आणि मागच्या-पुढच्या संदर्भासहित. गुगल केवळ संबंधित विषयाच्या विविध लिंका तुम्हाला सादर करते. चॅट जीपीटी ही त्या पुढची पायरी आहे.
गेल्याच महिन्यात हे तंत्रज्ञान अवतीर्ण झाले. अवघ्या महिनाभरात दहा लाखांहून अधिक युझर्सनी त्याचा वापर केला. इलॉन मस्क आणि एआयवनचे सीईओ सॅम अल्टमन यांनी चॅट जीपीटी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. एआयवनच्या संकेतस्थळावर जाऊन ट्राय चॅट जीपीटी असे सर्च करून या तंत्रज्ञानाचा वापर करता येतो.
अमुक एखाद्या विषयाची माहिती विचारल्यास चॅट जीपीटी त्यासंदर्भातील इत्थंभूत माहिती तुमच्यासमोर ठेवते. तुम्ही एखादा चुकीचा प्रश्न विचारलात तर तेही तुमच्या लक्षात आणून देते. तुम्हाला मजकूर कवितारूपात हवा असेल तर तेही चॅट जीपीटीला सहज शक्य आहे. एखाद्या मित्राप्रमाणे चॅट जीपीटी तुमच्याशी गप्पा मारते. तुम्हाला हव्या त्या विषयावरील हवी ती माहिती अचूकपणे उपलब्ध करून देते. तूर्त हे तंत्रज्ञान प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. येत्या काळात गुगलला ते पर्याय ठरू शकते. कथा, कविता, पटकथा, निबंध, बीजभाषणे इत्यादी साहित्य चॅट जीपीटीवरून सहज उपलब्ध होऊ शकते.