ट्विटरचा मालक बदलल्यानंतर आता या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये मोठे बदल होणार आहेत. ट्विटर ताब्यात घेताच मस्क यांनी धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली असून सीईओ आणि त्यांच्या सोबतच्या बड्या अधिकाऱ्यांच्या नोकरीवर पहिली कुऱ्हाड चालविली आहे. यानंतर आता त्यांनी थेट संचालक मंडळाकडे मोर्चा वळविला आहे.
मस्क यांनी सर्व बोर्ड डायरेक्टर्सना हटविले आहे. आता मस्क एकमेव डायरेक्टर बनले आहेत. डेली मेलनुसार मस्क यांनी ज्या डायरेक्टर्सना हटविले आहे, त्यात मार्था लेन फॉक्स, ओमिड कोर्डेस्टानी, डेविड रोसेनब्लैट, पैट्रिक पिचेट, एगॉन डरबन, फी-फी ली आणि मिमी अलेमायेहौ यांचा समावेश आहे.
२८ ऑक्टोबरला ट्विटरची खरेदी झाली. त्यानंतर मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल, सीएफओ नेड सेगल, लीगल अफेअर पॉलिसी हेड विजया गाड्डे यांना काढून टाकले होते. एवढेच नाही तर मस्क यांनी या तिघांनाही कंपनीच्या हेडक्वार्टरबाहेर जाण्यास सांगितले होते. ट्विटरसोबतचा करार पूर्ण झाला तेव्हा अग्रवाल आणि सेगल कार्यालयात उपस्थित होते. यानंतर त्यांना कार्यालयातून हाकलून देण्यात आले. याबाबत ट्विटर, इलॉन मस्क किंवा कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
मस्क यांचा नेहमीच कंटेंट मॉडरेशनला विरोध आहे. याबाबत त्यांनी विजया गाड्डेना बैठकीत बरेच काही सुनावले होते. आता ट्विटरवर कमी कंटेंट मॉडरेशन असेल अशी आशा आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते निलंबित करण्याचा निर्णय गाड्डेनीच घेतला होता. या निर्णयाला मस्क यांनी लोकांचा आवाज दाबण्याचे काम म्हटले होते. 4 एप्रिल रोजी, एलन मस्कनी ट्विटरमध्ये 9.2 टक्के हिस्सा विकत घेतला होता. यासह ते कंपनीचे सर्वात मोठे शेअरहोल्डर बनले होते. यामुळे कंपनीने त्यांना बोर्ड मेंबर होण्यासाठी आमंत्रित केले होते, परंतू मस्कनी नाकारले होते, आता मस्क यांनीच सर्व संचालकांना काढून टाकले आहे.