बंगळुरूस्थित सायबर-सिक्युरिटी फर्म टेक्नीसेक्टच्या माहितीनुसार तामिळनाडूची पब्लिक डिलिव्हरी सिस्टम (पीडीएस) हॅक होऊन जवळपास ५० लाख लोकांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. हॅकर्सनं नागरिकांची सर्व वैयक्तिक माहिती हॅकर फोरमवर अपलोड केली होती. यात ५० लाख नागरिकांचा आधारकार्ड क्रमांकासोबतच त्यांची महत्वाची माहिती, कुटुंबीयांची माहिती आणि मोबाइल नंबर यांचा समावेश होता.
हॅकर्स या माहितीचा उपयोग ऑनलाइन फिशिंगसाठी करू शकातत आणि राज्यातील वृद्ध व्यक्तींना लक्ष्य करू शकतात, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान राज्य सरकारनं याबाबतची अधिकृत माहिती अद्याप जाहीर केलेली नाहही. सायबर सिक्युरिटी स्टार्टअपनुसार वेबवर जो डेटा लीक झाला होता त्यात तामिळनाडूच्या एकूण ४९,१९,६६८ नागरिकांच्या माहितीचा समावेश होता. यात ३,५९,४८५ फोन नंबरसोबतच संबंधित युझर्सचे टपाल क्रमांक आणि आधार क्रमांक देखील समाविष्ट होते.
माहिती नेमकी कुठून लिक झाली?समोर आलेल्या माहितीनुसार, युझर्ससोबतच त्याच्या कुटुंबीयांसोबतच्या नात्याची माहिती माहिती हॅकर्सकडून अपलोड करण्यात आली होती. याची सर्वातआधी माहिती 'द वीक'नं प्रकाशित केली. हॅकर्सनं हॅक केलेली माहिती थेट तामिळनाडू सरकारशी संबंधित वेबसाइटवरुन चोरी करण्यात आली की थर्ड पार्टी वेबसाइटला लक्ष्य करुन माहितीची चोरी करण्यात आली याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता झालेली नाही.