नवी दिल्ली - पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडण्याचा विचार करत असाल तर मोबाइल अॅपच्या मदतीने डिजिटल सेव्हिंग खाते (Digital Saving Account) अगदी सहज उघडू शकता. पोस्ट ऑफिसकडून ग्राहकांना आयपीपीबी मोबाइल अॅपच्या (IPPB Mobile App) मदतीने ही सुविधा देत आहे. ज्या लोकांचे पोस्ट ऑफिस (Post Office) मध्ये खातं आहे ते इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) च्या माध्यमातून बॅलन्स तपासण्याव्यतिरिक्त पैशांची ट्रान्सफर आणि इतर काही आर्थिक व्यवहार देखील करू शकतात. कशाप्रकारे खातं उघडायचं आणि कोणते व्यवहार या माध्यमातून करता येतात हे जाणून घेऊया...
अशाप्रकारे उघडा IPPB Mobile App द्वारे खातं
- इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
- अर्जदार भारतीय नागरिक असायला हवा
- सर्वप्रथम तुम्ही तुमच्या फोनमध्ये IPPB Mobile Banking App डाऊनलोड करून घ्या
- App मध्ये ‘Open Account’ वर क्लिक करा- याठिकाणी विचारण्यात आलेली आवश्यक माहिती भरावी लागेल
- ओटीपी (OTP) मोबाईलवर पाठवला जाईल. तो टाका.
- या माहितीमध्ये आई-वडिलांचे नाव, शैक्षणिक पात्रता, पत्ता आणि नॉमिनी अशी माहिती भरावी लागेल
- यानंतर सबमिटवर क्लिक करा. अशाप्रकारे तुमचे खातं सुरू होईल.
खातेधारकांना त्यांचे खाते सक्रीय ठेवण्यासाठी आणि ते रेग्यूलर सेव्हिंग खात्यामध्ये बदलून घेण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. पोस्ट ऑफिस ग्राहकांच्या सुविधेसाठी बचत खात्याबरोबरत रेकरिंग डिपॉझिट (RD), पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF), सुकन्या समृद्धी अकाऊंट (SSA) या सेवा देखील देते. जर तुम्ही या स्कीम किंवा पोस्टाच्या अन्य कोणत्याही स्कीम घेत असाल तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या मदतीने डिजिटल पेमेंटही करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पोस्टाच्या तिकिटावर स्वत:चा फोटो छापायचाय?; फक्त 300 रुपयांत सहज शक्य, जाणून घ्या नेमकं कसं?
महान व्यक्ती किंवा महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या लोकांचे फोटो टपाल तिकिटावर छापण्याची प्रथा होती. मात्र आता नागरिकांना आता स्वत:चा फोटोही टपाल तिकिटावर छापता येणार आहे. तसेच कुटुंबीयांचा फोटो किंवा लग्नाच्या निमित्ताने पती-पत्नी आपला फोटो तिकिटावर छापू शकतात. यासाठी फक्त 300 रुपये खर्च करावे लागणार आहेत. पोस्टाच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारत सरकारची ही जुनी योजना आहे. मात्र अनेक लोकांना त्याबाबत माहिती नव्हती. या योजनेच्या माध्यमातून सामान्य व्यक्तीही टपाल तिकिटावर स्वत:चा फोटो छापू शकतो. 'माय स्टॅम्प' (My Stamp) असं या योजनेचं नाव आहे. या योजनेतंर्गत टपाल तिकिटावर फोटो छापण्यासाठी फक्त 300 रुपये इतका खर्च येतो. यामध्ये तुम्हाला 12 टपाल तिकिटे मिळतील. विशेष म्हणजे ही तिकिटं इतर टपाल तिकिटांप्रमाणे देशातील कोणत्याही भागात पाठवता येणार आहे.