एयर कंपनीने भारतात खास गेमर्ससाठी प्रिडेटर हेलिओस ३०० हा अतिशय दर्जेदार लॅपटॉप दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्याची घोषणा केली आहे.एसर प्रिडेटर हेलिओस ३०० या मॉडेलमध्ये कोअर आय ७ आणि आय ५ या प्रोसेसरचे दोन व्हेरियंट असून याचे मूल्य १,२९,९९० रूपयांपासून सुरू होणारे आहे. हा लॅपटॉप ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. याची रॅम १६ जीबी आणि सॉलिड स्टेट ड्राईव्ह (एसएसडी) या प्रकारातील २५६ जीबी स्टोअरेज असेल. तर हा लॅपटॉप ३२ जीबी रॅम आणि एक टीबी स्टोअरेज या पर्यायातही उपलब्ध करण्यात आला आहे. यात एनव्हिडीया जीफोर्स जीटीएक्स १०६० आणि १०५०टीआय हे अतिशय गतिमान ग्राफिक कार्ड प्रदान करण्यात आले आहेत. यामुळे यावर कोणताही गेम अगदी सुलभपणे खेळता येणार आहे.
कोणताही गेमिंग लॅपटॉप हा लवकर गरम होत असतो. ही बाब लक्षात घेत, या मॉडेलमध्ये एरोब्लेड थ्री-डी फॅन प्रदान करण्यात आला आहे. अर्थात या कुलींग सिस्टीममुळे दीर्घ काळापर्यंत गेम खेळूनही हे मॉडेल गरम होत नाही. याशिवाय हा लॅपटॉप प्रिडेटरसेन्स या विशेष प्रणालीने सज्ज असून याच्या मदतीने या सिस्टीमविषयी रिअलटाईम माहिती मिळू शकते. तर डॉल्बी ऑडिओ प्रिमीयममुळे यात अतिशय दर्जेदार अशा ध्वनीची अनुभुती घेता येते. गेमिंगमध्ये ध्वनी हा महत्त्वाचा घटक असल्यामुळे हे फिचर युजर्सच्या पसंतीस पडण्याची शक्यता असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर यामध्ये ब्लॅकलिट या प्रकारातील कि-बोर्ड असेल.
एसर प्रिडेटर हेलिओस ३०० या लॅपटॉपमध्ये गिगाबिट इथरनेट पोर्ट, युएसबी ३.१ टाईप-सी पोर्ट, दोन युएसबी २.० पोर्ट व एक एचडीएमआय २.० पोर्ट प्रदान करण्यात आले आहेत. तर यात ८०२.११एसी २ x २ मिमो तंत्रज्ञानाने युक्त असणारी वायरलेस प्रणाली देण्यात आली असून याच्या मदतीने विद्यमान प्रणालीपेक्षा दुप्पट गतीने कनेक्टिव्हिटी शक्य असल्याचा दावा एसर कंपनीने केला आहे.