काही दिवसांपूर्वीच एसर कंपनीने भारतात निट्रो ५ स्पीन कन्व्हर्टीबल गेमिंग लॅपटॉप लाँच केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा खास गेमर्ससाठी प्रिडेटर ट्रिटॉन ७०० हा लॅपटॉप सादर करण्यात आले आहे. हा अत्यंत सडपातळ अर्थात सुपर स्लीम लॅपटॉप या प्रकारातील असून याची जाडी फक्त १८.९ मिलीमीटर इतकी आहे. यात १५.६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी (१९२० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले प्रदान करण्यात आला असून यावर अत्युच्च दर्जाच्या ग्राफीक्सयुक्त गेमिंगचा आनंद घेता येणार आहे. या मॉडेलमध्ये इंटेलच्या सातव्या पिढीतील अत्यंत गतीमान असा कोअर आय-७ प्रोसेसर देण्यात आला असून याला एनव्हिडीया जीफोर्स जीटीएक्स १०८० ग्राफीक्स कार्डची जोड देण्यात आली आहे. याची रॅम तब्बल ३२ जीबी तर स्टोअरेज ५१२ जीबी इतके असेल. हे मॉडेल व्हिआर रेडी या प्रकारातील असल्याने यावर व्हर्च्युअल रिअॅलिटीवर आधारित गेमिंगचा प्राथमिक वापर करता येईल. तसेच यात उत्तम दर्जाचा किबोर्ड असेल.
गेमिंग लॅपटॉप हा मोठ्या प्रमाणात तापत असल्यामुळे यात चांगल्या दर्जाची कुलींग प्रणाली अपेक्षित असते. या अनुषंगाने एसर प्रिडेटर ट्रिटॉन ७०० या मॉडेलमध्ये दोन एयरोब्लेड थ्रीडी पंखे देण्यात आले आहेत. याशिवाय यात सहा हिट पाईप प्रदान करण्यात आले आहेत. यांच्या एकत्रित कार्यप्रणालीमुळे हा लॅपटॉप कितीही वापरला तरी तो थंड राहत असल्याचे एसर कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. यात थ्रीडी डॉल्बी अॅटमॉस ही दर्जेदार ऑडिओ सिस्टीम देण्यात आली आहे. यामुळे यात उत्तम दर्जाच्या ध्वनीची अनुभुती घेता येणार आहे. हा लॅपटॉप विंडोज १० प्रणालीच्या होम एडिशनवर चालणारा आहे. ते कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय आणि ब्ल्यु-टुथसह युएसबी, युएसबी ३.०, एचडीएमआय, थंडरबोल्ट आदी पर्याय देण्यात आले आहेत. एसर प्रिडेटर ट्रिटॉन ७०० हा लॅपटॉप ग्राहकांना फ्लिपकार्टसह एसरच्या देशभरातील शॉपीजमधून २,९९,९९० रूपये मूल्यात खरेदी करता येईल.