एसर कंपनीने अतिशय स्वीफ्ट ५, स्पीन ५ आणि स्वीच ७ हे तीन ‘टु-इन-वन’ मॉडेल्स सादर केले असून ते लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारात वापरता येणार आहेत.
तंत्रज्ञान विश्वात अत्यंत प्रतिष्ठीत मानल्या जाणार्या आयएफए-२०१७ या प्रदर्शनीस प्रारंभ होत असतांना अनेक टेक कंपन्यांनी आपापले आगामी प्रॉडक्ट जगासमोर सादर केले आहेत. यात एसर या ख्यातप्राप्त कंपनीने स्वीफ्ट, स्पीन आणि स्वीच या मालिकेतील टु-इन-वन म्हणजेच लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारात वापरण्याजोगे मॉडेल्स लाँच केले आहेत. हे सर्व मॉडेल्स विंडोज १० या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारे असून यात इंटेलचे अत्यंत गतीमान असे प्रोसेसर प्रदान करण्यात आले आहेत. येत्या काही महिन्यात भारतासह जगातील विविध राष्ट्रांमध्ये हे तिन्ही मॉडेल्स ग्राहकांना प्रत्यक्षात उपलब्ध करण्यात येणार आहेत.
एसर स्वीफ्ट ५
एसर स्वीफ्ट ५ या मॉडेलमध्ये १४ इंच आकारमानाचा आणि १०८० बाय १९२० म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा टचस्क्रीन डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम ८ जीबी तर स्टोअरेजसाठी २५६ आणि ५१२ जीबी असे पर्याय असतील. यात ट्रु हार्मनी आणि डॉल्बी ऑडिओ प्रिमीयम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याच्या मदतीने सुश्राव्य ध्वनीची अनुभुती घेता येणार आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनर, युएसबी टाईप-सी पोर्ट आदी विशेष फिचर्सदेखील देण्यात आले आहेत. यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर आठ तासांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात स्काईप फॉर बिझनेसची सुविधादेखील देण्यात आली आहे.
एसर स्पीन ५
एसर स्पीन ५ या मॉडेलमध्ये १३ आणि १५ इंच डिस्प्लेच्या दोन पर्यायांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. यात इंटेलने अलीकडेच जाहीर केलेला आठव्या पिढीतला प्रोसेसर देण्यात आला आहे. यात १६ जीबीपर्यंत रॅम तर एक ५१२ जीबीपर्यंत स्टोअरेजचे पर्याय देण्यात आले आहेत. यातील बॅटरी तब्बल १३ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर यातील १५ इंची मॉडेलमध्ये एनव्हिडीया कंपनीचे जीफोर्स जीटीएक्स१०५० हे ग्राफीक कार्डही असेल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे याच्यासोबत एसर कंपनीच्या स्टायलस पेनचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामुळे आयपॅडप्रमाणे यावर नोटस् घेणे आणि रेखाटन करणे शक्य आहे. मात्र हा स्टायलस पेन प्रत्येक मॉडेलसोबत मिळणार नसून यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतील. यात एचडी वेबकॅम देण्यात आला आहे.
एसर स्वीच ७
या मॉडेलला एसर स्वीच ७ ब्लॅक एडिशन या नावाने लाँच करण्यात आले असून १३.५ इंची २२५६ बाय १५०५ पिक्सल्स क्षमतेचा टचस्क्रीन डिस्प्ले असेल. यात एसर कंपनीने विकसित केलेली ड्युअल लिक्वीडलूप फॅनलेस कुलींग प्रणाली असल्याने दीर्घ काळापर्यंत वापर करूनदेखील हा तापत नसल्याचा कंपनीचा दावा आहे. यात एनव्हिडीया कंपनीचे जीफोर्स एमएक्स १५० हे ग्राफीक कार्ड प्रदान करण्यात आले आहे. यातदेखील स्टायलस पेनचा सपोर्ट देण्यात आला असून युजर याचा ऐच्छीक वापर करू शकेल.