एसर कंपनीने भारतात निट्रो ५ हा कन्व्हर्टीबल गेमिंग लॅपटॉप लाँच केला असून हे मॉडेल ग्राहकांना फ्लिपकार्टसह कंपनीच्या देशभरातील शॉपीजमधून खरेदी करता येणार आहे.
नावातच नमूद असल्यानुसार हा कन्व्हर्टीबल या प्रकारातील असल्यामुळे हे मॉडेल लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारांमध्ये वापरता येणार आहे. आणि एसर कंपनीने भारतात या प्रकारातील हे पहिलेच मॉडेल सादर केले आहे. भारतात गेमिंगचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारत असून या पार्श्वभूमिवर हे मॉडेल गेमर्ससाठी एक उत्तम पर्याय ठरणार असल्याचे प्रतिपादन कंपनीतर्फे करण्यात आले आहे. खरं तर गेमिंग लॅपटॉपची डिझाईन फारशी आकर्षक नसल्याचे गेमर्सची तक्रार असते. मात्र या समजाला फाटा देत एसर कंपनीने आपल्या या नवीन मॉडलचा लूक अतिशय आकर्षक असाच ठेवला आहे. तर यातील फिचर्सदेखील सरस आहेत.
एसर निट्रो ५ स्पीन कन्व्हर्टीबल गेमिंग लॅपटॉप या मॉडेलमध्ये आठव्या पिढीतला अत्यंत गतीमान असा इंटेलचा कोअर आय-७ प्रोसेसर असेल. यासोबत कोअर आय-५ प्रोसेसरचा पर्यायदेखील असून याला एनव्हिडीया जीफोर्स जीटीएक्स १०५० या ग्राफीक कार्डची जोड देण्यात आली आहे. यामुळे गेमर्सला विविध गेम्सचा अतिशय सुलभपणे आनंद घेता येणार आहे. गेमिंगमध्ये ध्वनी हा खूप महत्वाचा घटक आहे. यामुळे यात दोन दर्जेदार स्पीकर आणि एक सब-वुफर देण्यात आले आहे. याच्या जोडीला एसरच्या ट्रु-हार्मनी आणि स्मार्ट अँम्पलीफायरसह डॉल्बी ऑडिओ प्रिमीयम या प्रणाली देण्यात आल्या आहेत.
एसर निट्रो ५ स्पीन कन्व्हर्टीबल गेमिंग लॅपटॉप या मॉडेलमध्ये १५.६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा टचस्क्रीन डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. हा डिस्प्ले ३६० अंशात वापरणे शक्य आहे. याची रॅम ८ जीबी तर २५६ जीबी इतके एसएसडी तर १ टेराबाईटची हार्ड डिस्कच्या स्वरूपात स्टोअरेज असेल. यात अतिशय दर्जेदार असा ब्लॅकलिट या प्रकारातील कि-बोर्ड दिलेला आहे. हा लॅपटॉप विंडोज १० या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा असेल. यात वाय-फाय आणि ब्ल्यु-टुथ कनेक्टिव्हिटीसह युएसबी, युएसबी ३.०, युएसबी टाईप-सी, एचडीएमआय, टु-इन-वन कार्ड रीडर आदी फिचर्स असतील. तर यात ३२२० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे १० तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. याच्या कोअर आय-५ प्रोसेसरयुक्त मॉडेलचे मूल्य ७९,९९० तर आय-७ प्रोसेसरयुक्त मॉडेलचे मूल्य ९४,९९० रूपये असेल.