देशात फाईव्ह जी नेटवर्कचे जाळे उभारण्यात येत असून ऑगस्टच्या शेवटी नाही तर सप्टेंबरच्या अखेरीस 5G सेवा सुरु होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. परंतू, देशातील सर्वच भागांत ही सेवा पोहोचण्यासाठी पुढील दोन-तीन वर्षे लागणार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.
अधिकाधिक सर्कलमध्ये एक स्थीर फाईव्ह जी नेटवर्क १२ ऑक्टोबरपर्यंत स्थापित करण्यात येणार आहे. तर देशात २९ सप्टेंबरला फाईव्ह जी सेवा सुरु केली जाणार आहे. या तारखा जरी केंद्रीय मंत्र्यांनी जाहीर केलेल्या असल्या तरी एअरटेलने याच ऑगस्ट महिन्यात ५जी सेवा सुरु करण्याचा दावा केलेला आहे.
या उद्योगात सुमारे 2.5-3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येण्याची आमची अपेक्षा आहे. 3 लाख कोटी रुपये ही मोठी गुंतवणूक आहे. यामुळे मोठी रोजगारनिर्मिती देखील होणार आहे. येत्या दोन-तीन वर्षांत ५जी देशातील सर्व भागांत पोहोचेल असा विश्वास आहे, असे वैष्णव म्हणाले.
बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे या 13 प्रमुख भारतीय शहरांमध्ये हाय-स्पीड 5G इंटरनेट सुरू होईल, असे DoT ने यापूर्वी जाहीर केले होते.
अदानींची 'माघार'...अदानी ग्रुप आता टेलिकॉम क्षेत्रात एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात अदानींनी अचानक एन्ट्री केली होती. यावेळी जसे फोर जी वेळी झालेले तसेच ५जी वेळी होईल असे वाटत होते. अदानींची कंपनी फाईव्ह जी सुरु करून जिओ, एअरटेलला टक्कर देईल असे वाटत होते. परंतू तसे होणार नाहीय. अदानी ग्रुपने ते केवळ B2B स्पेसमध्येच सेवा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
एअरटेलदेखील ऑगस्टच्या अखेरीस ५जी सेवा सुरु करण्याची तयारी करत आहे. एअरटेल कंपनीने लिलावात 900 मेगाहर्ट्झ, 1800 मेगाहर्ट्झ, 2100 मेगाहर्ट्झ, 3300 मेगाहर्ट्झ आणि 26 गीगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीमध्ये 19867.8 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम विकत घेतले होते. तर रिलायन्स जिओदेखील 5G सेवा सुरु करण्याची तयारी करत आहे. यामुळे एकामागोमाग एक अशा तीन कंपन्या देशभरात ५जी सेवा लाँच करणार आहेत.