सोमवारी रात्री व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर (Whatsapp, Instagram, Facebook and facebook messenger) या सेवा तब्बल सहा तासांसाठी पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या. सर्व्हरमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडणींमुळे या तिन्ही सेवा बंद पडल्या होत्या. यानंतर मात्र बुधवारी सकाळी काही वेळासाठी रिलायन्स जिओचं नेटवर्कही (Reliance Jio) डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर ट्विटरवर #jiodown ट्रेंड करत होता. अनेकांनी नेटवर्क डाऊन झाल्यामुळे सोशल मीडियावरून संतापही व्यक्त केला.
रिलायन्स जिओचे नेटवर्क संपूर्ण देशात बाधित झालं नसलं तरी ट्विटरवरील माहितीनुसार मध्यप्रदेश, छत्तीसगढ, मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि आणखी काही शहरांमध्ये ग्राहकांना समस्या जाणवत होत्या. एक ते दीड तासांसाठी रिलायन्स जिओच्या ग्राहकांना समस्या जाणवत होत्या. जुलै महिन्यात रिलासन्स जिओच्या अॅक्टिव्ह ग्राहकांची संख्या ६१ लाखांनी वाढली. तर भारती एअरटेलच्या (Bharti Airtel) च्या युझर्सच्या संख्येत २३ लाखांची वाढ झाल्याची माहिती भारतीय दूरसंचार नियामक ट्रायच्या आकडेवारीवरून समोर आलं. जुलैच्या अखेरिस जिओच्या मोबाईल युझर्सची संख्या ३४.६४ कोटी इतकी होती.
फेसबुकच्या सर्व सेवा बंदसोमवारी रात्री काही तासांसाठी फेसबुकच्या सर्व सेवा ठप्प झाल्या होत्या. फेसबुक आणि इन्स्टाग्राम सहा तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी बंद राहिल्यानंतर भारतीय वेळेनुसार ते ३ वाजून २४ मिनिटांनी पुन्हा सुरू करण्यात आलं. तर दुसरीकडे Whatsapp तब्बल ७ तासांनंतर म्हणजेच भारतीय वेळेनुसार सकाळी ४ वाजून १९ मिनिटांनी सुरू झालं. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप या तिन्हीवर फेसबुकचं स्वामित्व आहे. यामुळे या तिन्हीचे सर्व्हर एकमेकांशी जोडलेले आहे.