नवी दिल्ली - टाटा स्काय, डिश टीव्हीसारख्या डीटीएच धारकांसाठी एक खूशखबर आहे. कारण लवकरच डीटीएच धारकांना मेसेजच्या माध्यमातून चॅनेल लिस्ट बदलता येणार आहे. तसेच हवं ते चॅनेल सबस्क्राइब किंवा अनसबस्क्राइब करता येणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने डिस्ट्रीब्युशन प्लॅटफॉर्म्स ऑपरेटर्सना (डीपीओ) मेसेजच्या माध्यमातून चॅनेल जोडण्याची किंवा हटवण्याची सुविधा युजर्सना देण्यात यावी असे आदेश दिले आहेत.
ट्रायच्या नव्या अधिसुचनेनुसार, मेसेजच्या माध्यमातून चॅनेल घेण्याची किंवा हटवण्याची सुविधाही डीटीएचधारकांना पंधरा दिवसांच्या आत लागू करण्यात येणार आहे. तसेच डीटीएच धारकांनी पाठवलेल्या विनंत्याही डीपीओंना 72 तासांच्या आत लागू कराव्या लागणार आहेत. नव्या नियमांनुसार सबस्क्रायबर्सनी ज्या कालावधीसाठी सेवा घेतली आहे, तितक्याच कालावधीसाठी पैसे आकारले जाणार आहे.
चॅनेल सबस्क्राइब आणि अनसबस्क्राइब करण्याच्या सर्व प्रक्रियेची माहिती लवकरच टीव्हीवर चॅनेल नंबर 999 वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आता लवकरच टाटा स्काय, डिश टीव्हीसारख्या डीटीएच धारकांना केवळ एका मेसेजच्या माध्यमातून चॅनेल घेता येणार आहे किंवा हटवता येणार आहे. दूरसंचार नियामक आयोगाच्या नवीन नियमावलीमुळे डीटीएच सेवेचे दर वाढले आहेत. या वाढलेल्या दरांमुळे देशातील एप्रिल ते जून या कालावधीत देशभरातील डीटीएच सेवेच्या ग्राहक संख्येत तब्बल 25 टक्क्यांनी म्हणजेच 2 कोटीने घट झाली आहे.
दूरसंचार नियामक आयोग म्हणजेच ‘ट्राय’च्या अहवालानुसार, एप्रिल ते जून या तिमाहीत डीटीएच ग्राहकांची संख्या 54.26 दशलक्ष झाली आहे. ही संख्या जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये 72.44 दशलक्ष होती. एप्रिल महिन्यापासून लागू झालेल्या ट्रायच्या नवीन नियमावलीमुळे हा फटका बसल्याचे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. ट्रायच्या नियमावलीमुळे ग्राहकांना वाहिन्यांची निवड करण्याचे स्वातंत्र्य मिळेल व केबल, डीटीएचचे दर कमी होतील, असा दावा ट्रायतर्फे करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात ट्रायच्या नियमावलीचा फटका ग्राहकांनाच बसला व दरामध्ये वाढ झाली. त्यामुळे या ग्राहकांनी डीटीएच सेवा सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.