नवी दिल्ली - हॅकिंगच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हॅकर्स अत्यंत शिताफीने युजर्सचा डेटा चोरत आहेत. यामुळे युजर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हॉट्सअॅपनंतर आता काही मेसेजिंग अॅप्सना हॅकिंगचा धोका निर्माण झाला आहे. Telegram आणि Signal या मेसेजिंग अॅपना याचा फटका बसू शकतो. टेलिग्रामवर व्हॉट्सअॅपप्रमाणे एंड-टू-एंड इनक्रिप्शनची सुविधा मिळत नाही. यासाठी सिक्रेट चॅट हे फीचर देण्यात आले आहे. त्यामुळे हे काही प्रमाणात सुरक्षित मानलं जातं.
मॅसचुसट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (MIT) च्या एका रिपोर्टनुसार, टेलिग्राम अॅपमध्ये काही बग असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. टेलिग्रामकडून स्वतः च्या मालकीच्या MTProto चा वापर केला जातो. याशिवाय कोणीही एमटी प्रोटो सर्व्हर सिस्टमचं नियंत्रण मिळाल्यास पूर्ण मेटाडेटासह इनक्रिप्टेड मेसेजही हॅक करू शकतं. तसेच MIT च्या संशोधकांनी टेलिग्राम युजर्स सिक्रेट चॅट फीचरचा वापर करत असतील तरीही थर्ड पार्टीसाठी मेटाडेटा मिळवणं शक्य आहे असा दावा केला आहे.
टेक पॉलिसी आणि मीडिया कन्सल्टंट प्रशांतो रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपला Pegasus अटॅकची माहिती मिळताच त्यावर उपाय शोधला आणि युजर्सलाही याबाबत कल्पना दिली. याशिवाय व्हॉट्सअॅपने सरकारला Pegasus स्पायवेअर कंपनीची माहिती देत कोर्टात याचिकाही दाखल केली. टेलिग्राम आणि सिग्नल यांसारखे मेसेंजर व्हॉट्सअॅपसारखी सुरक्षा क्वचितच देऊ शकतील, ते जास्तीत जास्त बग दूर करू शकतील असंही रॉय यांनी म्हटलं आहे.
10 प्रसिद्ध अँड्रॉईड स्मार्टफोनला आता हॅकिंगचा फटका बसला आहे. हे स्मार्टफोनला हॅक करुन त्यातील माहितीची हेरगिरी केली जाऊ शकते अशी धक्कादायक माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. सिक्यॉरिटी रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार, ब्लूटूथ आणि यूएसबीचा वापर करुन हेरगिरी केली जाऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. यासाठी अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये AT कमांडची मदत घेतली जाते. बेसबँड सॉफ्टवेअरशी कम्युनिकेट करण्यासाठी अँड्रॉईडमध्ये AT कमांडचा वापर केला जातो. रिपोर्टनुसार, हॅकर्स IMEI आणि IMSI नंबर मिळवण्यासाठी, फोन कॉल रोखण्यासाठी, हे फोन कॉल्स इतर नंबरवर वळवण्यासाठी, कॉलिंग फीचर ब्लॉक करण्यासाठी आणि इंटरनेट बंद करण्यासाठी या ट्रिकचा वापर करू शकतात. या रिपोर्टमध्ये 10 प्रसिद्ध अँड्रॉईड फोनचीही यादी देण्यात आली आहे ज्याचा वापर हॅकर्स करू शकतात.