सायबर फसवणुकीच्या अनेक घटना दररोज समोर येत आहेत. स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्याची पद्धत दिवसेंदिवस बदलत आहेत. हे लोक सतत निष्पाप आणि प्रामाणिक लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत असतात. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वृद्धाला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुदैवाने शहाणपणामुळे ते या फसवणुकीतून बचावले.
न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, लखनौचे रहिवासी जेपी मिश्रा यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) द्वारे नुकताच एक फेक कॉल करण्यात आला होता, ज्यामध्ये सीबीआय अधिकारी बोलत असून त्यांचा मुलगा सीबीआयच्या ताब्यात असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि त्याला वाचवण्यासाठी एका जागी त्वरीत जा असं सांगितलं. मात्र वृद्धाने या स्कॅमर्सना सांगितलं की, आपल्या मुलाने चूक केली असेल तर त्याला शिक्षा करून तुरुंगात पाठवले पाहिजे. खरंतर त्यांना त्यांचा मुलगा कुठे आहे हे माहीत होतं.
बनावट कॉलपासून सुरक्षित राहा!
अशा अनेक घटना देशात घडल्या आहेत, काही लोक या सापळ्यात अडकले आणि काही लोक जेपी मिश्रा यांच्यासारखे निघाले ज्यांनी संयम राखला आणि आपला मुलगा कुठे आहे हे स्वत: शोधून काढलं. अशाच प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी वृद्धांनी सतर्क राहण्याची गरज आहे. असा कोणताही कॉल आल्यास आधी तुमचा मुलगा कुठे आहे आणि तो काय करत आहे याची खातरजमा करा आणि त्यानंतर ज्या क्रमांकावरून कॉल आला असेल त्या क्रमांकाच्या नावावर तक्रार नोंदवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती कधीही कोणाशीही शेअर करू नका.
जर कोणत्याही व्यक्तीला डिजिटल सुरक्षेसंदर्भात मदत हवी असेल आणि खोट्या कॉल्सपासून सुरक्षित कसं राहायचे हे जाणून घ्यायचं असेल, तर ते हेल्प इज इंडियाचा मोबाईल नंबर 8009154444 वर कॉल करू शकतात. या क्रमांकावर कॉल करून लोकांसाठी मोफत कार्यशाळा आयोजित केली जाईल.