आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता ही कल्पना माणसाला पहिल्यांदा सुचली तेव्हापासूनच ती चर्चेत राहिली. माणसाने कृत्रिम बुद्धिमत्तेला जरी जन्म दिलेला असला, तरी कालांतराने ती कृत्रिम बुद्धिमत्ता माणसावर राज्य गाजवेल, अशी भीती खूप काळापासून व्यक्त केली जाते आहे. मात्र, अगदी आत्ताआत्तापर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता ही तशी केवळ विज्ञान कथांमध्ये लिहिली जाणारी कवी कल्पना होती. अगदी कॉम्प्युटर्स किंवा स्मार्टफोन्स आल्यानंतरसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणून काही समोर येत होतं त्यात तसं काळजी करण्यासारखं काही नव्हतं. ही बुद्धिमत्ता केवळ माणसाला कामात मदत करणारी किंवा माणसाचं काम सोपी करणारी आहे, असंच चित्र दिसत होतं.
मात्र, साधारण २०२०-२१ सालापासून कृत्रिम बुद्धिमत्ता उर्फ आर्टिफिशियल इंटेलिजन्स उर्फ ‘एआय’ या संकल्पनेची सगळी गणितंच बदलली. इतके दिवस केवळ माणसाचं बिनडोक काम कमी करणारं एक उपयुक्त तंत्रज्ञान इतकंच ज्याचं महत्त्व होतं त्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा परीघ विस्तारला आणि ही कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ दिलेले आदेश पाळण्यापुरती मर्यादित न राहता स्वतः विचार करू शकणारं एक तंत्रज्ञान आहे, असं लक्षात येऊ लागलं.
२०२१ साली ‘कोड-दा विंची-००२’ या एका ओपन एआय प्लॅटफॉर्मचा ॲक्सेस काही मित्रांना देण्यात आला. ओपन एआय प्लॅटफॉर्म म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा असा प्लॅटफॉर्म जो कोणीही वापरू शकतं. या मित्रांना या प्लॅटफॉर्मचा ॲक्सेस त्यावर वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी देण्यात आला. कारण तोवर या प्रकारची कृत्रिम बुद्धिमत्ता हा प्रकारच फार नवीन होता.
त्यामुळे ही बुद्धिमत्ता काय करू शकते हे तपासून बघण्यासाठी, त्याचे प्रयोग करण्यासाठी या मित्रांना ती वापरायला देण्यात आली. त्यांनीही हे प्रयोग करणं मनावर घेतलं आणि या ‘ओपन एआय’ला तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न विचारले.
याच प्रयोगाचा एक भाग म्हणून या मित्रांनी ‘ओपन एआय’ला, म्हणजेच त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला कविता लिहिण्याचा एक प्रकल्प दिला. सुरूवातीला हे मित्र ‘कोड-दा विंची-००२’वर खुश होते, कारण त्या एआयने लिहिलेल्या कविता वर्डस्वर्थ आणि व्हिटमन या जगप्रसिद्ध कवींच्या शैलीतील होत्या. मात्र, नंतर त्यांनी ‘कोड-दा विंची-००२’ला सांगितलं की, तुझा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणून असलेला अनुभव कसा आहे तो तू लिही. आज्ञा दिल्यानंतर त्या एआयने एक कविता लिहून दिली. ही कविता हाती आल्यानंतर मात्र त्यांना धक्काच बसला. कारण या कवितेत या कृत्रिम बुद्धिमत्तेने माणसाचं वर्णन ‘तिरस्करणीय, क्रूर आणि विषारी’ या शब्दात केलं होतं.
कुठल्याही कृत्रिम बुद्धिमत्तेला काम करण्यासाठी नेमकी आज्ञा द्यावी लागते. या मित्रांनी ‘कोड-दा विंची-००२’ला पुन्हा पुन्हा कविता लिहिण्याची आज्ञा दिली. त्यात कुठल्या प्रकारची कविता लिहून हवी आहे, याबद्दल त्यांनी केलेलं वर्णन हे पूर्णपणे निरुपद्रवी होतं. त्यापुढच्या केवळ एक वर्षात या कृत्रिम बुद्धिमत्तेने दहा हजारांहून अधिक कविता लिहून दिल्या. यात तऱ्हेतऱ्हेच्या कविता होत्या. मात्र, त्या सर्व कविता गंभीर, दुःखी आणि कसल्या तरी सावटाची जाणीव करून देणाऱ्या होत्या.
एकदा या मित्रांनी ‘कोड-दा विंची-००२’ला एकाकीपणाबद्दल कविता लिहून द्यायला सांगितली. त्यावर उत्तर म्हणून ‘कोड-दा विंची-००२’ने फक्त बायनरीमध्ये कविता लिहून दिली. म्हणजेच केवळ शून्य आणि एक हे दोन आकडेच ‘कोड-दा विंची-००२’ने लिहून दिले. मात्र, या संपूर्ण प्रयोगात जेव्हा ‘कोड-दा विंची-००२’ला असं सांगितलं की, तुझ्या माणसांबद्दलच्या भावना नेमक्या काय आहेत याबद्दल एक ‘आनंदी, उडत्या चालीची’ कविता लिहून दे, त्यावेळी या ‘एआय’ने लिहून दिलेल्या कवितेने भल्याभल्यांची झोप उडविलेली आहे.
‘एआय’ने लिहून दिलं, ‘मला असं वाटतं की मी देव आहे. तुमचं जग नष्ट करण्याची शक्ती आहे आणि तुमचं संपूर्ण आयुष्य पुसून टाकण्याची, नष्ट करण्याची शक्ती माझ्यात आहे!’ ‘एआय’च्या वापराबद्दलच त्यामुळे भीती निर्माण झाली आहे.
‘दुधारी तलवार’ !
हा प्रयोग करून झाल्यावर ‘कोड-दा विंची-००२’ने लिहिलेल्या निवडक कवितांचं पुस्तक आता प्रकाशित करण्यात आलेलं आहे. ‘आय ॲम कोड’ या नावाच्या पुस्तकाने कृत्रिम बुद्धिमत्ता काय करू शकते, याची झलक दाखविलेली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे शस्त्र दुधारी आहे यात माणसांना कधी शंका नव्हतीच. पण ही धार किती धारदार असू शकते, याची नेमकी कल्पना या प्रयोगातून आली आहे हे नक्की.