नवी दिल्ली : आताच्या घडीला टेलिकॉम क्षेत्रात खूप मोठी स्पर्धा असल्याचे पाहायला मिळत आहे. टेलिकॉम कंपन्या अधिकाधिक युझर्स जोडण्यावर भर दिला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांकडून विविध ऑफर्सही दिल्या जात आहेत. नंबर पोर्ट करण्याच्या सुविधेमुळे नेटवर्क प्रोव्हाइडर बदलणे सोपे झाले आहे. याचा फायदाही हजारो ग्राहक घेत आहेत. टेलिकॉम ऑपरेटर एअरटेलने नवीन सब्सक्राइबर्समध्ये जिओवर मात करीत नंबर वन स्थान पटकावले आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) डेटाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबर २०२० च्या डेटावरून एअरटेलने नोव्हेंबरमध्ये ४३ लाख नवीन मोबाइल युझर्स जोडले. व्होडाफोन-आयडिया आणि भारत संचार निगम लिमिटेड नोव्हेंबर महिन्यांत आपले अनेक ग्राहक गमावले आहेत.
जिओने नोव्हेंबर महिन्यात सुमारे १३ लाख नवीन मोबाइल युझर्स जोडले. ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत जिओने ०.४८ टक्के वाढ नोंदवली आहे. तर, एअरटेलने १.३ टक्के वाढीची नोंद केली. जिओचा बाजारातील शेअर ३५.३४ टक्के, एअरटेलचा २८.९७ टक्के, व्होडाफोन-आयडियाचा २५.१ टक्के आहे, अशी माहिती मिळाली आहे.
Reliance Jio ला पछाडलं; Airtel ठरलं देशातील पहिलं 5G रेडी नेटवर्क
नोव्हेंबर २०२० च्या अखेरपर्यंत १,१५१,८१ मिलियन वायरलेस युझर्स वाढले आहेत. एअरटेलकडे सर्वाधिक अॅक्टिव्ह वायरलेस युझर्स ९६.६३ टक्के आहेत. जिओकडे ७९.५५ टक्के, व्होडाफोन-आयडियाकडे ८९.०१ टक्के आणि बीएसएनएलकडे ५१.७२ टक्के युझर्स आहेत, अशी माहिती ट्रायकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, देशात 5G सेवा सुरू करण्याच्या बाबतीत एअरटेलने रिलायन्स जिओला पछाडले आहे. भारती एअरटेलने एका कमर्शिअल नेटवर्कवर लाइव्ह 5G ची यशस्वी चाचणी केली. अशी चाचणी करणारी एअरटेल ही पहिली कंपनी ठरली आहे. एअरटेलने १८०० मेगाहर्ट्झ बँडमध्ये एनएसए (नॉन स्टँड अलोन) नेटवर्क तंत्रज्ञानाद्वारे विद्यमान लिबरलाइज्ड स्पेक्ट्रमद्वारे ही सेवा लाइव्ह केली. 5G सेवा रेडिओ, कोअर आणि ट्रान्सपोर्ट या सर्व डोमेनसाठी कम्पॅटिबल असेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.