नवी दिल्ली - भारतीय दूरसंचार सेवा कंपनी एअरटेलच्या ग्राहकांना नेटवर्क समस्येला तोंड द्यावं लागत आहे. देशातील अनेक भागात एअरटेलच्या नेटवर्कमध्ये अडथळा येत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. याबाबत ट्विटरवरून ग्राहकांनी एअरटेलच्या नेटवर्कबाबत तक्रारी मांडल्या आहेत. एअरटेल ग्राहकांना मोबाईल डेटा पूर्ण क्षमतेने वापरण्यास अडचणी येत असल्याचं ग्राहक सांगत आहेत.
एअरटेलच्या या तांत्रिक समस्येचा परिणाम सर्वच ग्राहकांवर पडला नाही. तर काही मोजक्याच ग्राहकांना नेटवर्क कमी येत असल्याचं आढळून आले आहे. इंडियन एक्सप्रेसनुसार, कॉल रिसेप्शन, सिग्नल आणि मोबाईल डेटा सेवांवर एअरटेलच्या कमी नेटवर्कमुळे परिणाम झाला आहे. काही भागात ही समस्या असल्याचं पाहायला मिळत आहे. ट्विटरवर एका युजरने एअरटेलचं नेटवर्क सगळीकडे डाऊन आहे की मलाच ही समस्या जाणवतेय असा प्रश्न विचारला आहे.
मुंबई, दिल्ली, जयपूर, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि गुवाहाटीसह अन्य भागात ही समस्या जाणवत असल्याचं समोर आले आहेत. २८ मे दुपारी १.५० मिनिटांपासून ग्राहकांना नेटवर्क समस्येला तोंड द्याव लागत आहे. अनेक युजर्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही तक्रार मांडली आहे. नेटवर्क कमरतेमुळे इंटरनेट स्पीडने काम करत नाही. जवळपास २ तास ही समस्या ग्राहकांना सहन करावी लागली.