झोलो कंपनीने आपला किफायतशीर दरातला आणि फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा इरा वन एक्स प्रो हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.
झोलो कंपनीने आजवर बहुतांश एंट्री लेव्हलचे स्मार्टफोन लाँच केले आहेत. इरा वन एक्स प्रो हे मॉडेलदेखील याला अपवाद नाही. अर्थात या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असल्याने रिलायन्स जिओसह अन्य व्हिओएलटीई सेवांचा वापर करणेदेखील शक्य आहे. फिचर्सचा विचार करता यात पाच इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजे १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात १.५ गेगाहर्टझ क्वॉड-कोअर प्रोसेसर असून याची रॅम दोन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असेल. मायक्रो-एसडी कार्डचा सपोर्ट असल्याने हे स्टोअरेज ३२ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ६.० म्हणजेच मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारा आहे. ऑटो-फोकस आणि एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा तर फ्रंट कॅमेर्यात ड्युअल एलईडी फ्लॅश असून त्याची क्षमता ५ मेगापिक्सल्सची असेल. मुख्य कॅमेर्यामध्ये स्लो-मोशन व्हिडीओ, लाईव्ह फोटो, टाईम लॅप्स व्हिडीओ, ऑडिओ नोटस्, ब्युटी मोड, बर्स्ट मोड आदी विशेष फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. तर फ्रंट कॅमेर्याच्या मदतीने उत्तम दर्जाचे सेल्फी तसेच व्हिडीओ कॉलिंग करता येईल. या मॉडेलमध्ये अँबियंट लाईट सेन्सर, प्रॉक्झीमिटी सेन्सर आणि अॅक्सलेरोमीटरचा समावेश करण्यात आला आहे. तर यात २५०० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची लिथियम पॉलिमर बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल एक दिवसापर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. ब्लॅक आणि गोल्ड या दोन रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आलेले हे मॉडेल स्नॅपडील या शॉपिंग पोर्टलवरून ग्राहकांना ५,८८८ रूपये मुल्यात खरेदी करता येणार आहे.