सध्या एआयचा जमाना सुरु झाला आहे. कोणतीही गोष्ट ही चांगल्या वापरासाठी, भल्यासाठी शोधली जाते, परंतू वाईट प्रवृत्ती त्याता वापर वाईटासाठी करतात याचा अनुभव जगाने अनेकदा घेतला आहे. अणु उर्जेचा शोध कशासाठी लावला गेला आणि त्याचा वापर अणुबॉम्ब, अण्वस्त्रांसाठीही झाल्याचे जगाने पाहिलेय, भोगले आहे. एआयचेही तसेच होताना दिसत आहे. एआय हे तंत्रज्ञान उपयुक्त जरी असले तरी त्याचा वापर महिलांना निर्वस्त्र दाखविण्यासाठी करण्यात येत आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे २४ दशलक्ष लोकांना निर्वस्त्र करणाऱ्या वेबसाईटला भेट दिली होती.
सोशल नेटवर्क अॅनालिसिस कंपनी 'ग्राफिका'ने यावर एक अहवाल सादर केला आहे. लोकांच्या फोटोतील कपडे काढून टाकून त्यांना निर्वस्त्र दाखविणाऱ्या या एआय वेबसाईट प्रसिद्ध सोशल मीडिया नेटवर्कचा वापर करत आहेत. अशाप्रकारच्या जाहिरातींमध्ये एक्स आणि रेडीटसह सोशल मीडियावर २४०० टक्क्यांची वाढ झाली आहे. कोणत्याही फोटोला निर्वस्त्र करण्यासाठी एआयचा वापर केला जात आहे.
यातून धक्कादायक बाब समोर आलीय ती म्हणजे अधिकतर साईटवर महिलांविरोधात काम केले जात आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रतिबंधही केले जात नाहीएत. डीप फेकने खळबळ उडविलेली असताना एखाद्या महिलेचे नग्न फोटो वापरून वाईट प्रवृत्तीचे लोक काहीही घडवून आणू शकतात, अशी भीती तज्ञांना वाटू लागली आहे.
या प्रकारामुळे पुन्हा एकदा पॉर्नोग्राफीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एआयच्याच मदतीने हे फोटो शेअर देखील केले जात आहेत. हे एवढे खतरनाक आहे की एखाद्या महिलेची बदनामी अगदी सहजरित्या केली जाऊ शकते. असे असले तरी या एप्सवर कोणतीही कारवाई करण्यात येत नाहीय. या अॅप्सची पॉप्य़ुलॅरिटीदेखील यामुळेच वाऱ्याच्या वेगाने वाढू लागली आहे.