अॅमेझॉन अलेक्सा ही व्हॉइस असिस्टंट मोठ्याप्रमाणावर लोकप्रिय होत आहे. कंपनीच्या स्मार्ट स्पिकर्सच्या माध्यमातून या एआय असिस्टंटचा प्रसार होत आहे. काही दिवसांपूर्वी या अलेक्सा ऐवजी सेलेब्रेटींचा आवाज ऐकता यावा म्हणून नवीन फिचर सादर करण्यात आलं होतं. आता तर तुमच्या मृत पावलेल्या नातेवाईकांच्या आवाजाची देखील नक्कल अॅमेझॉन अलेक्सा करू शकते. या फिचरची घोषणा कंपनीनं केली आहे.
हयात नसलेल्या लोकांचा आवाज ऐकू येणार
TechCrunch च्या रिपोर्टनुसार, Amazon नं आपल्या व्हॉइस असिस्टंट Alexa ला एक असं फीचर देण्याची तयारी करत आहे, ज्यामुळे युजर्स आपल्या मृत नातेवाईकांशी जोडले जाऊ शकतील. विशेष म्हणज या फिचरची घोषणा स्वतः अॅमेझॉननं आपल्या लास वेगासमध्ये सुरु असलेल्या मार्स कॉन्फ्रेंसमधून केली आहे.
अशी टेक्नॉलजीची तयार करण्यात आली आहे जी काही सेकंदात कोणाचाही हाय क्वॉलिटी आवाज प्रोड्युस करते. अॅमेझॉननं हे फिचर युजर्सपासून कायमचे दूर गेलेल्या नातेवाईकांचा आवाज त्यांना पुन्हा ऐकता यावा म्हणून तयार केलं आहे. या फिचरचा एक डेमो देखील या इव्हेंटमधून दाखवण्यात आला आहे.
कॉन्फ्रेंसमध्ये दाखवण्यात आलेल्या डेमोमध्ये एका लहान मुलाने अलेक्साला विचारले, “अलेक्सा, माझी आजी मला विजार्ड ऑफ ओजची गोष्ट ऐकवू शकते का? त्यानंतर, अलेक्सानं त्या मुलाला आजीच्या आवाजात संपूर्ण गोष्ट ऐकवली. विशेष म्हणजे त्या मुलाची आजी हे जग सोडून गेली आहे. अॅमेझॉननं जरी हे फिचर खूप उपयुक्त असल्याचं म्हटलं असलं तरी सोशल मीडियावर याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तसेच काही युजर्सनी या फिचरचे दुरुपयोग देखील दाखवून दिले आहेत.