अमेझॉन कंपनीने आपल्या इको या स्मार्ट स्पीकरच्या दरात घसघशीत कपात केली असून याची उपयुक्तता वाढविण्याची घोषणा केली आहे. यातच गुगल आणि अॅपलनेही आपापल्या स्मार्ट स्पीकरमध्ये नवनवीन फंक्शन्सचा अंतर्भाव करण्याचे संकेत दिल्यामुळे या क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण होण्याचे संकेत आहेत.
ध्वनी आज्ञावलीवर आधारित स्मार्ट स्पीकर आता जगभरात लोकप्रिय होऊ लागले आहेत. सुमारे तीन वर्षांपूर्वी अमेझॉन कंपनीने इको हे मॉडेल लाँच करून या क्षेत्रात आघाडी घेतली होती. इको हा स्मार्ट स्पीकर अमेझॉनच्या अलेक्झा या व्हाईस कमांड सिस्टीमवर आधारित आहे. यानंतर मार्च २०१६मध्ये याचीच इको डॉट ही मिनी आवृत्ती सादर केली. अमेझॉन टॉपदेखील याच प्रकारातील मॉडेल आहे. तर यावर्षी अमेझॉनने इको लूक, इको शो आणि इको स्पॉट हे तीन नवीन मॉडेल सादर केले आहेत. यातील इको लूक या मॉडेलमध्ये इनबिल्ट कॅमेरा तर इको स्पॉटमध्ये व्हिडीओ कॉलिंगसाठी ७ इंची टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. अर्थात आता अमेझॉन इको हे घरातील अत्यावश्यक उपकरणांपैकी एक म्हणून ख्यात झाले आहे. तर दुसरीकडे अमेझॉन इकोला टक्कर देण्यासाठी गुगलने गुगल होम हा स्मार्ट स्पीकर लाँच केला असून अॅपलनेही होमपॉड हे उपकरण बाजारपेठेत उतारण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यानच्या कालखंडात सोनी, जेबीएल आदी कंपन्यांनी गुगल असिस्टंटचा उपयोग करून स्मार्ट स्पीकर ग्राहकांना सादर केले आहेत. यातच गुगल ४ ऑक्टोबर रोजीच्या मेगा इव्हेंटमध्ये गुगल होमची नवीन आवृत्ती लाँच करण्याचे संकेत मिळाले आहेत. या पार्श्वभूमिवर अमेझॉन कंपनीने स्मार्ट स्पीकरच्या क्षेत्रातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या उत्पादनाच्या मूल्यात कपात केली आहे.
याच्या अंतर्गत इकोच्या मूळ मॉडेलचे मूल्य १८० डॉलर्सहून १०० डॉलर्स करण्यात आले आहे. अर्थात यात तब्बल ८० डॉलर्सची कपात करण्यात आली आहे. याशिवाय इको प्लस या नावाने नवीन स्मार्ट स्पीकर १५० डॉलर्स मूल्यात लाँच करण्यात येणार असल्याचे घोषणादेखील करण्यात आली आहे. यात अतिशय दर्जेदार वुफर आणि ट्युटरसह डॉल्बी ध्वनी प्रणालीचा समावेश असेल. याशिवाय इको प्रणालीवर आधारित इको कनेक्ट होम फोनदेखील ३५ डॉलर्स इतक्या मूल्यात ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहे. यात घरातील दूरध्वनीला अमेझॉन इकोसोबत कनेक्ट करण्यात आले आहे. याशिवाय इको स्पॉट हे अलार्म क्लॉकसारखे दिसणारे उपकरण १२९.९९ डॉलर्समध्ये ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. यात २.५ इंच आकारमानाचा टचस्क्रीन डिस्प्ले असून कॉलिंग, व्हिडीओ कॉन्फरन्सींगसह स्मार्ट स्पीकरचे अन्य फंक्शन्स देण्यात आले आहेत.