आतापर्यंत अनेक अँड्रॉइड कंपन्यांनी प्रयत्न करून देखील परफॉर्मन्सच्या बाबतीत Apple iPad ला टक्कर देणाऱ्या टॅबलेटची निर्मिती करणे जमले नाही. ज्याप्रकारे आयपॅडचा वापर गेमिंगसाठी केला जातो तसा वापर अँड्रॉइड टॅबचा होताना दिसत नाही. परंतु आता हे दृश्य बदलणार आहे. एक चिनी स्मार्टफोन कंपनी दमदार गेमिंग टॅबलेटवर काम करत आहे, अशी माहिती गिज्मोचायनाने दिली आहे.
प्रसिद्ध चिनी लीकस्टर Digital Chat Station ने वीबो पोस्ट करून अशी माहिती दिली आहे कि, स्मार्टफोन मॅन्युफॅक्चर अँड्रॉइड आधारित गेमिंग टॅबलेटवर काम करत आहे. हा टॅबलेट Qualcomm Snapdragon 8xx चिपसेटसह लाँच केला जाईल. या टॅबमध्ये 120Hz किंवा 144Hz रिफ्रेश रेट असलेला LCD डिस्प्ले देण्यात येईल. तसेच हा टॅब 100W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे, हा गेमिंग टॅब बाजारातील प्रीमियम टॅबपेक्षा खूप स्वस्त असेल.
कोणत्या कंपनीचा असेल हा गेमिंग टॅबलेट
हा टॅब बनवणाऱ्या कंपनीच्या नावाची माहिती समोर आली नाही. त्यामुळे आता फक्त अंदाज वर्तवले जात आहेत. गेमिंग स्मार्टफोन्स बनवणाऱ्या ASUS, Red Magic, आणि Black Shark या कंपन्यांची नावे प्रामुख्याने समोर येत आहेत. असे जरी असले तरी इतर कंपन्या देखील असा कारनामा करू शकतात. याव्यतिरिक्त या टॅबलेटशी निगडित इतर कोणतीही माहिती समोर आली नाही. आशा आहे कि, येत्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल.