गुगलने अँड्रॉईडला लाँच करून नुकतीच दहा वर्षे झाली असताना आतापर्यंत मोफत मिळणारी या ऑपरेटींग सिस्टिमवरील अॅपसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. सध्या युरोपात गुगलच्या सुविधा वापरण्यासाठी 40 डॉलर म्हणजेच 3 हजार रुपये आकारले जाणार आहेत.
The Verge च्या अहवालामध्ये प्रत्येक स्मार्टफोनमागे कंपन्यांना 3 हजार रुपये गुगलला द्यावे लागणार आहेत. फेब्रुवारी 2019 नंतर अॅक्टीव्हेट झालेल्या फोनसाठी हे पैसे मोजावे लागणार आहेत. प्रत्येक देश आणि डिव्हाईसप्रमाणे याचे दरही वेगवेगळे असण्याची शक्यता आहे. यासाठी गुगल काही कंपन्यांसोबत करारही करत आहे. यामध्ये लायसन्स कॉस्ट आकारण्यात येणार आहे. ज्या कंपन्या त्यांच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम आणि सर्च इंजिन वापरण्यास इच्छुक आहेत त्यांच्याशी करार करण्यात येणार आहे.
जुलैमध्ये युरोपियन युनियनने गुगलला प्रतिस्पर्धी नियम तोडल्याच्या प्रकरणात दोषी ठरवत 34 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. युरोपियन युनियनकडून आतापर्यंत एखाद्या कंपनीला ठोठावला गेलेला सर्वाधिक दंड आहे. गुगलवर असा आरोप करण्यात आला होता की, गुगलने सॅमसंग, हुवावे सारख्या मोबाईल, टॅबलेट कंपन्यांना गुगल सर्च इंजिन आणि गुगल क्रोम प्री- इन्स्टॉल करण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला होता.
यामुळे गुगलने ही अॅप इन्स्टॉल करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांकडून लायसन्स फी आकारण्य़ाचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यातच गुगलने यासंबंधीची माहिती दिली आहे. गुगल स्मार्टफोनवर ही अॅप मोफत देत होती. यानंतर त्या अॅपवर दाखविण्यात येणाऱ्या जाहिरातींपासून उत्पन्न घेत होती.
गुगलच्या निर्णयानुसार प्ले स्टोअर आणि अन्य गुगलची अॅप हवी असतील तर पैसे द्यावे लागणार आहेत. आता ही रक्कम प्राथमिक स्वरुपात कंपन्या भरणार असली तरीही याची किंमत त्या ग्राहकांकडून वसूल करणार आहेत. यामुळे मोबाईलच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे.