मुंबई - रिलायन्स कंपनीच्या जिओफोनला उदंड प्रतिसाद लाभला असला तरी यापुढे ही कंपनी अँड्रॉइड या प्रणालीवर आधारित स्मार्टफोन आणणार असल्याची माहिती समोर आली आहे. रिलायन्सच्या जिओ सेवेला गेल्या वर्षी सप्टेबर महिन्यात प्रारंभ झाला होता. प्रारंभी मोफत आणि नंतर अल्प मूल्यात फोर-ची व्हिओएलटीई सेवा उपलब्ध करून जिओने अक्षरश: भारतीय सेल्युलर क्षेत्रात धमाल उडवून दिली. यामुळे अन्य कंपन्यांनाही नाईलाजाने किफायतशीर प्लॅन जाहीर करावे लागते. अर्थात कंपन्या जिओच्या प्राईस वॉरशी टक्कर घेण्यासाठी तयार होत असतांनाच जिओफोनची घोषणा करण्यात आली. अवघ्या १५०० रूपयाची डिपॉजिट घेऊन जिओफोन ग्राहकांना सादर करण्यात आला. अर्थात तीन वर्षानंतर हे पैसे युजरला परत मिळण्यास असल्यामुळे हा फोन ग्राहकांना मोफत मिळणार असल्यामुळे यावर उड्या पडल्या. देशभरातून याला विक्रमी प्रतिसाद लाभला. जिओफोन आता ग्राहकांना पाठविण्यास प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमिवर आता याच्या पुढील टप्प्यासाठी नोंदणी सुरू होण्याआधी रिलायन्सने आपल्या रणनितीत बदल केल्याचे दिसून येत आहे. जिओफोन हा फायरफॉक्स ओएसपासून विकसित करण्यात आलेल्या कायओएस या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा आहे. मात्र जिओफोनमध्ये सर्व अँड्रॉइड अॅप्स चालत नसल्यामुळे युजर्सची कुचंबणा होत आहे. यामुळे पुढील मॉडेल हे शुध्द अँड्रॉइडवरच चालणारे असावे असा विचार रिलायन्सचे व्यवस्थापन करत आहे. यामुळे आता जिओफोनचे उत्पादन थांबविण्यात आले असून स्वस्त अँड्रॉइड फोनच्या उत्पादनाबाबत विचार केला जात आहे. याबाबत फॅक्टरडेली या टेक पोर्टलने वृत्त प्रकाशित केले आहे.
या वृत्तानुसार रिलायन्सने आपल्या स्ट्रॅटेजीत बदल करण्यासाठी अनेक बाबी कारणीभूत आहेत. यातच एयरटेल, व्होडाफोन आदी कंपन्यांनीही अतिशय किफायतशीर मूल्यात स्मार्टफोन सादर करण्याचा सपाटा लावला आहे. प्रतिस्पर्धी कंपन्यांचे स्मार्टफोन हे अँड्रॉइडवर चालणारे असल्याची बाब लक्षात घेत आता जिओनेही हाच मार्ग पत्करण्याचे संकेत दिले आहेत. विशेष बाब म्हणजे जिओने ऑगस्ट महिन्यातच जिओफोनची बुकींग बंद केली असून लवकरच दुसर्या टप्प्याची नोंदणी सुरू होणार असल्याचे घोषीत केले आहे. याचा विचार करता दुसर्या टप्प्यात अँड्रॉइडवर आधारित स्मार्टफोनची घोषणा करण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे.