नवी दिल्ली: अॅण्ड्रॉइड मोबाइल बाजारात गुगलचा वरचष्मा आहे. गुगलच्या या ऑपरेटिंग सिस्टमचा बहुतांश स्मार्टफोन्समध्ये वापरली जाते. या स्थितीचा फायदा घेऊन स्पर्धाविषयक नियमांची पायमल्ली केल्याच्या आरोपावरून गुगलला १,३३७.७६ कोटी रुपयांचा दंड भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने (सीसीआय) ठोठावला आहे.
आयोगाने म्हटले की, मोबाइलसाठी परवाना क्षम ओएस, अॅण्ड्रॉइड फोनसाठी अॅप स्टोअर, इत्यादी क्षेत्रांमध्ये गुगल प्रबळ आहे. याचा गैरफायदा घेऊन गुगलने आपली संपूर्ण 'गुगल मोबाइल स्यूट' (जीएमएस) अॅप्लिकेशन अँड डिस्ट्रिब्युशन अॅग्रीमेंट अंतर्गत मोबाइल व संबंधित डिव्हायसेसमध्ये प्री-इन्स्टॉल करणे बंधनकारक केले आहे. वापरकर्त्यांना त्यापैकी अनावश्यक अॅप अनइन्स्टॉलचा पर्यायही दिला जात नाही. यामुळे प्रतिस्पर्धा कायद्याचा भंग होते, असे आयोगाने दंड ठोठावताना म्हटले आहे.
गुगलची ॲण्ड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टम (ओएस) स्मार्टफोन बाजारात भारतासह जगात प्रबळ आहे. अॅपलची 'आयओएस' ही ओएस ॲण्ड्रॉइडच्या स्पर्धेत आहे.
>> सीसीआयने गुगलविरुद्ध सीज अँड डेसिस्ट आदेशही जारी केला आहे. अनुचित व्यावसायिक पद्धती बंद करून विहित कालावधीत वर्तणूक सुधारा, असे या आदेशात सीसीआयने म्हटले आहे.>> तसेच आवश्यक वित्तीय तपशील आणि दस्तावेज सादर करण्यासाठी गुगलला ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
ओयो, मेक माय ट्रिपलादेखील ३९२ कोटी रुपयांचा दंड>> प्रतिस्पर्धाविषयक नियमांचा भंग केल्याच्या आरोपावरून सीसीआयने मेक माय ट्रिप गोआयबीबो (एमएमटी-गो) आणि ओयो यांना ३९२ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मेक माय ट्रिप आपल्या प्लॅटफॉर्म सर्च रिझल्टमध्ये ओयोला सर्वात वर दाखविते.>> परिणामी इतर हॉटेल भागीदारांना नुकसान होते. त्यामुळे सीसीआयने ओयोला १६८.८८ कोटी रुपयांचा, तर मेक माय ट्रिपगोआयबीबोला २२३.४८ कोटींचा दंड ठोठावला आहे.>> आयोगाने एमएमटी-गो यांना करारात बदल करण्याचेही आदेश दिले आहेत. सर्व हॉटेल्सला समान संधी मिळायला हवी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.