व्हर्च्युअल रिअॅलिटी म्हणजेच आभासी सत्यता हे अतिशय उत्कंठावर्धक क्षेत्र असून यात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. सध्या व्हिआरची अनुभुती घेण्यासाठी काही हेडसेट बाजारपेठेत उपलब्ध आहेत. यात आता एचटीसी कंपनीच्या व्हाईव्ह फोकस हेडसेटची भर पडली आहे. यात अनेक उत्तम फीचर्स आहेत. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे या हेडसेटमध्येच हाय डेफिनेशन क्षमतेचा सुपर अमोलेड डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. परिणामी हा हेडसेट संगणकाला संलग्न करण्याची आवश्यकता नाही.
तसेच यात स्मार्टफोनची गरजदेखील नाही. अर्थात हा स्टँडअलोन व्हिआर हेडसेट आहे. यात सिक्स अॅक्सीस ऑफ फ्रिडम ही प्रणाली देण्यात आली आहे. याच्या मदतीने ३६० अंशातील आभासी सत्यतेची अत्युच्च अनुभुती घेता येत असल्याचा दावा एचटीसी कंपनीने केला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८३५ हा अतिशय गतीमान प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. तसेच यासोबत उत्तम दर्जाचा कंट्रोलरही देण्यात येणार आहे. हा हेडसेट एचटीसी कंपनीने विकसित केलेल्या व्हाईव्ह वेव्ह या नवीन व्हीआर प्रणालीनुसार तयार करण्यात आला आहे. तर कंपनीच्या व्हाईव्हपोर्ट या अॅप स्टोअरवर व्हर्च्युअल रिअॅलिटीतील अनेक अॅप आणि कंटेंट उपलब्ध आहेत. याचा आनंद व्हाईव्ह फोकसमध्ये घेता येणार आहे.
फेसबुकने अलीकडेच ऑक्युलस गो हा स्टँडअलोन याच प्रकारातील व्हिआर हेडसेट जाहीर केला असून याचे मूल्य १९९ डॉलर्स इतके ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमिवर एचटीसी व्हाईव्ह फोकसचे मूल्य मात्र या कंपनीने अद्याप जाहीर केलेले नाही. तथापि, फेसबुकच्या मॉडेलची स्पर्धा करावयाची असल्यास याच रेंजमध्ये याचे मूल्य असेल असे मानले जात आहे. पहिल्यांदा हा हेडसेट चीनमध्ये मिळणार आहे. यानंतर तो भारतासह अन्य बाजारपेठांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.