अनेकदा तुम्ही ऐकले असेल एखाद्याकडे असलेले डोमेन विकत घेण्यासाठी कंपन्यांनी हजारो डॉलर्स मोजले आहेत. अशाच एका संधीच्या शोधात असलेल्या तरुणाने रिलायन्स, हॉटस्टारच्या नावाचे डोमेन रजिस्टर करून रिलायन्सलाच संपर्क साधा असा मेसेज त्यावर पोस्ट केला आहे.
JioCinema आणि Disney+ Hotstar यांचे विलिनीकरण होणार आहे. या दोन्ही कंपन्या एकाच प्लॅटफॉर्मवर हा डेटा आणू शकतात अशी चर्चा आहे. जिओ सिनेमातील जिओ आणि डिस्ने हॉटस्टारमधील हॉटस्टार असे त्यांच्या वेबसाईटचे नाव असू शकते. असा अंदाज लावून पठ्ठ्याने ही डील होण्यापूर्वीच Jiohotstar हे डोमेन खरेदी करून ठेवले आहे.
हे डोमेन खरेदी केल्यावर त्याने त्या https://jiohotstar.com वेबसाईटवर एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. यात त्याने रिलायन्स इंडस्ट्रीजकडे मोठी मागणी केली आहे. ''मला शिकण्यासाठी पुढील खर्चाचे पैसे जी कंपनी देईल त्यांना मी हे डोमेन देणार आहे. हे डोमेन खरेदी करण्याचा माझा हेतू साफ आहे. यामुळे मला पुढे केम्ब्रिजमध्ये शिकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल'', असे अंबुजेश यादव नावाच्या तरुणाने म्हटले आहे. त्याने तो अॅप डेव्हलपर असल्याचा दावा केला आहे.
यादव म्हणतोय की, तो एका स्टार्टअपवर काम करत आहे. २०२३ च्या सुरुवातीला त्याला सोशल मीडियावरून हॉटस्टारने आयपीएलची डील गमावली आणि त्यांचे अॅक्टिव्ह युजर्स कमी होऊ लागल्याचे समजले होते. यामुळे कंपनी कोणत्यातरी भारतीय कंपनीसोबत विलिनीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यात रिलायन्सची Viacom 18 हीच कंपनी हॉटस्टार घेऊ शकते, असे वाटले. जेव्हा रिलायन्सने सावन विकत घेतली तेव्हा त्यांनी Saavn.com चे डोमेन बदलून JioSaavn.com केले होते. यामुळे हॉटस्टार घेतले तर jiohotstar करतील असे वाटले. यामुळे हे ड़ोमेन रजिस्टर केल्याचे तो म्हणाला.
आता जर रिलायन्सला हे डोमेन हवे असेल तर तो सांगेल ती किंमत मोजून ते त्यांना विकत घ्यावे लागणार आहे. यानंतर हा तरुण त्याच्या स्वप्नानुसार परदेशात शिक्षणासाठी जाऊ शकणार आहे.