नवी दिल्ली-
Apple iPhone 14 Pro गेल्या वर्षी लॉन्च झाला. या फोनमधून खूप चांगल्या प्रतीची सिनेमेटोग्राफी देखील केली जाऊ शकते. हेच या लेटेस्ट फोनचं वैशिष्ट्य देखील आहे. याच फोनच्या सहाय्यानं बॉलीवूडचे दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी संपूर्ण चित्रपट शूट केला आहे. महत्वाची बाब म्हणजे हा सिनेमा Apple कंपनीचे सीईओ टीम कूक यांनीही पाहिला आणि त्यांनाही आवडला आहे.
दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा 'फुर्सत' सिनेमा पूर्णपणे आयफोन-१४ प्रोमधून शूट करण्यात आला आहे. या सिनेमाचा व्हिडिओ यूट्यूबवरही अपलोड करण्यात आला आहे. जवळपास ३० मिनिटांचा हा शॉर्ट सिनेमा iPhone 14 Pro मध्ये शूट करण्यात आला आहे. सिनेमात अनेक मजेदार सीन्स आणि शॉट्सचा वापर करण्यात आला आहे. सिनेमाची कथा देखील चांगली आहे.
Apple चे CEO टीम कूक यांनी या सिनेमाला शुभेच्छा देखील दिल्या आहेत आणि iPhone 14 Pro मधून सिनेमाचं संपूर्ण शूटिंग केल्याबद्दलही आनंद व्यक्त केला आहे.
टीम कूक यांनी केलं कौतुकटीम कूक यांनी सिनेमाच्या व्हिडिओ लिंक ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांची ही बॉलीवूडची फिल्म जरूर पाहा. तुम्हाला जर भविष्य दिसू लागलं तर काय-काय होऊ शकतं. उत्कृष्ट सिनेमेटोग्राफी आणि कोरियोग्राफी असून संपूर्ण सिनेमा आयफोनवर शूट करण्यात आला आहे", असं टीम कूक यांनी म्हटलं आहे.
टीम कूक यांच्या ट्विटवर दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी टीम कूक यांनी केलेल्या कौतुकाबद्दल आभार व्यक्त केले. आयफोनवर सिनेमा शूट करुन तो यूट्यूबवर अपलोड करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही कंपनीनं असं केलं आहे. असा व्हिडिओंच्या माध्यमातून कंपनी आपल्या फोनच्या कॅमेराची गुणवत्ता सिद्ध करत असते. iPhone 14 Pro मध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत १,२९,९०० रुपयांपासून सुरू होते.