जगभरात प्रतिक्षा असलेल्या आयफोन १६ चे वेध सुरु झाले आहेत. ९ सप्टेंबरला रात्री १०.३० वाजता लाँचिंग सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या फोनची किंमती किती असेल याची चर्चा आणि अंदाज लावण्यास सुरुवात झाली आहे. काही वर्षांपूर्वी ५० हजार ते ८० हजाराला असलेला आयफोन कधी दोन लाखांवर गेला ते कळलेच नाही. यामुळे यंदाच्या आयफोनची किंमत दोन लाखांपार जाणार असल्याचे सांगितले जात आहे. अशातच अॅप्पल हबने किंमत लीक केली आहे.
पुढील आठवड्याच्या सुरवातीला आयफोन १६, आयफोन १६ प्लस, आयफोन १६ प्रो आणि प्रो मॅक्स असे चार फोन लाँच होणार आहेत. तसेच अॅप्पल लॅपटॉप, वॉच आदी उत्पादनेही लाँच केली जाणार आहेत.
लीकनुसार iPhone 16 ची किंमत $799 (अंदाजे रु. 66,300) असू शकते. iPhone 16 Plus मॉडेलची सुरुवातीची किंमत $899 (अंदाजे रु. 74,600) असू शकते. प्रो मॉडेल्स – iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max ची सुरुवातीची किंमत $1,099 (अंदाजे रु 91,200) आणि iPhone 16 Pro Max - $1,199 (अंदाजे रु. 99,500) आहे.
आयफोन १५ च्याच किंमतीत यंदाचा आयफोन १६ लाँच केला जाण्याची शक्यता आहे. असे झाले तर ते जगातील मोठे आश्चर्यच ठरणार आहे. कारण अॅप्पलने आयफोनच्या किंमती मागील मॉडेलपेक्षा अव्वाचेसव्वा वाढविल्याच आहेत. त्या तेवढ्याच ठेवल्या तर ते आयफोन प्रेमींना धक्का देणारे ठरणार आहे.
डिस्प्लेचा आकार Apple iPhone 16 आणि 16 Plus 6.1-इंच आणि 6.7-इंचाचा असू शकतो. तर आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स, 6.3-इंच आणि 6.9-इंचाच्या मोठ्या स्क्रीनसह येण्याची शक्यता आहे.