नवी दिल्ली-
Apple iPhone विकत घेण्यासाठी एकादा व्यक्ती किती खर्च करू शकतो? तर जास्तीत जास्त १ ते दीड लाख रुपये. पण एका १६ वर्ष जुन्या लॉन्च झालेल्या आयफोनसाठी एखाद्यानं लाखो रुपये खर्च केले गेले. लोक सध्या आयफोन-१५ ची वाट पाहत आहेत. पण दुसरीकडे एका जुन्या आयफोनसाठी लाखो रुपये खर्च केले गेले आहेत. यामागचं कारण देखील तितकच खास आहे.
तब्बल ५० लाखांना विकला गेलेला हा आयफोन २००७ साली सादर करण्यात आला होता. स्टीव जॉब्स यांनी तो लॉन्च केला होता आणि हा फोन इंडस्ट्रीसाठी गेम चेंजर ठरला होता. फोनमध्ये ३.५ इंचाचा डिस्प्ले आणि २ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला होता. यासोबतच होम बटण देखील फोनला होतं.
५२ लाखांची बोलीआयफोन वापरणं हळूहळू स्टेटस सिम्बॉल मानलं जाऊ लागलं. फोनची किंमत देखील प्रत्येक व्हर्जननुसार वाढू लागली. आता आयफोन-१५ ची वाट पाहिली जात आहे. तर अशातच एकानं फर्स्ट जनरेशन आयफोनसाठी तब्बल ५२ लाख रुपये खर्च केले आहेत. आता फर्स्ट जनरेशन आयफोनची लाखो रुपयांमध्ये विक्री झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
फर्स्ट जनरेशन आयफोनसाठीची ही आजवरची सर्वात मोठी बोली मानली जात आहे. याआधी गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात एकानं फर्स्ट जनरेशन आयफोनसाठी ३२ लाख रुपये खर्च केले होते. आता तोही रेकॉर्ड मोडीस निघाला आहे. लिलाव करणाऱ्या वेबसाइटचं नाव LCG ऑक्शन असं आहे. या वेबसाईटवर झालेल्या लिलावात फर्स्ट जनरेशन आयफोनसाठी ६३,३५६.४० डॉलरची बोली लागली आहे. याचे भारतीय रुपयामध्ये ही किंमत जवळपास ५२ लाख रुपये इतकी होते.
बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार या फर्स्ट जनरेशन आयफोनच्या मूळ मालकाचं नाव Karen Green असं आहे. ती एक कॉस्मॅटिक टॅटू आर्टिस्ट असून न्यू जर्सी येथे राहते. तिला फर्स्ट जनरेशन आयफोन गिफ्टमध्ये मिळाला होता. पण आजवर तिनं तो आयफोन कधी वापरलाच नाही. तो तसाच बॉक्समध्ये इतकी वर्ष पडून होता. अखेर तिनं या आयफोनचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लिलाव करण्यात आलेला आयफोनचं व्हर्जन जुनं असलं तरी तो नवाकोराच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.