नवी दिल्ली-
अॅपल कंपनीकडून iPhone मधून हळूहळू काही गोष्टी कमी करण्यात येत आहेत. याआधी हेडफोन जॅक आणि टच आयडी हटवण्यात आल्यानंतर आता नव्या iPhone मध्ये तुम्हाला इअरफोन्स व चार्जर देखील कंपनीकडून दिला जात नाही. चार्जर आणि इअरफोन तुम्हाला वेगळे खरेदी करावे लागतात. आता तर iPhone मधून सिम कार्ड ट्रे देखील हटवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तुम्ही सोशल मीडिया फॉलो करत असाल तर याचे अनेक मिम्स देखील व्हायरल झाले आहेत. अॅपल कंपनी भविष्यात iPhone सोबत काहीच देणार नाही आणि स्मार्टफोनचा प्रत्येक पार्ट तुम्हाला वेगळा खरेदी करावा लागेल याचंही एक मिम सोशल मीडियात तुफान व्हायरल झालं होतं.
दरम्यान, नव्या माहितीनुसार आयफोन आता केवळ ई-सिम सपोर्टसह उपलब्ध करुन देण्याचा कंपनीचा मानस आहे. आयफोनमध्ये सध्याच्या मॉडल्समध्येही ई-सिमचा पर्याय उपलब्ध आहे. पण फिजिकल सिमसाठी देखील एक सिम कार्ड ट्रे देण्यात आला आहे.
अॅपल कंपनीनं अमेरिकेतील बड्या टेलिकॉम कंपन्यांशी ई-सिम ओन्ली आयफोन मॉडल्ससाठी जोरदार तयारी करत आहेत. विशेष म्हणजे असा फोन याच वर्षात दाखल होऊ शकतो.
आयफोनकडून जर फक्त ई-सिम असलेला फोन लॉन्च करण्यात आला तर तुम्हाला फोनमध्ये फिजिकल सिम कार्ड वापरता येणार नाही. यासाठी तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हायडरकडून ई-सिमची सेवा घ्यावी लागणार आहे. त्यानंतर तुम्ही ई-सिम असणारा आयफोन वापरू शकणार आहात.
ग्लोबल डेटा अॅनालिसिसच्या अंदाजानुसार कंपनी यंदा फक्त ई-सिमला सपोर्ट करणारे आयफोन बाजारात आणतील याची शक्यता फार कमी आहे. कंपनीकडून याबाबत हळूहळू निर्णय घेतला जाईल. म्हणजेच आयफोन-१४ चा फक्त एक मॉडल ई-सिमसह लॉन्च करण्यात येईल. ज्यात सिम कार्ड ट्रे उपलब्ध नसेल. त्यानंतर युझर्सची प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर कंपनी पुढील निर्णय घेईल, असं सांगण्यात येत आहे.