अॅपल कंपनीने आपल्या स्मार्टवॉचच्या बळावर वेअरेबल्स उपकरणांमध्ये पुन्हा पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अॅपल कंपनीला वेअरेबल्स म्हणजेच परिधान करण्यायोग्य उपकरणांच्या विक्रीत मोठा फटका बसला होता. यात शाओमी आणि फिटबीट या कंपन्यांनी अॅपलला मागे सारत अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावला होता. तथापि, या वर्षाच्या तिसर्या तिमाहीत म्हणजेच जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यानच्या कालखंडात अॅपलने जोरदार मुसंडी मारत परत पहिला क्रमांक पटकावला असल्याचे कॅनालीज या रिसर्च फर्मच्या अहवालातून दिसून आले आहे. या कालखंडात अॅपलची सुमारे ३६ लाख उपकरणे विकले गेली. तर ३५.५ आणि ३५ लाख उपकरणांच्या विक्रीसह शाओमी दुसर्या तर फिटबीट तिसर्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. वेअरेबल्सच्या क्षेत्रात आता अॅपलचा सर्वाधीक म्हणजे २३ टक्के वाटा असून शाओमी आणि फिटबीटचा अनुक्रमे २१ आणि २० टक्के वाटा असल्याचे या अहवालातून जाहीर करण्यात आले आहे.
अॅपल कंपनीच्या सेरीज ३ या स्मार्टवॉचला जगभरात मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली आहे. याच्या बळावरच अॅपल कंपनीने पुन्हा वेअरेबल्सच्या क्षेत्रात आघाडी घेतली असल्याचा मानले जात आहे. येत्या तिमाहीतही हाच ट्रेंड कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.