अॅपल कंपनी लवकरच भारतात आपली अॅपल पे ही डिजीटल पेमेंट प्रणाली लाँच करणार असल्याचे संकेत मिळाले असून याची चाचणीदेखील सुरू झाली आहे. भारतात डिजीटल पेमेंट सिस्टीममध्ये सध्या प्रचंड चुरस सुरू झाली आहे. विशेषत: नोटाबंदीनंतर ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे मोबाईल वॅलेटसह अन्य डिजीटल पेमेंट सिस्टीम्सची लोकप्रियतादेखील वाढीस लागली आहे. अलीकडच्या कालखंडाचा विचार करता केंद्र सरकारच्या युपीआय या प्रणालीवर आधारित डिजीटल पेमेंट सिस्टीम्स मोठ्या प्रमाणात लाँच होत आहेत. आताच गुगलने यावरच आधारित तेज ही प्रणाली लाँच केली असून व्हाटसअॅपदेखील येत्या काही दिवसात याच स्वरूपाची डिजीटल पेमेंट सिस्टीम सादर करण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमिवर, आपण स्पर्धेत मागे राहू नये म्हणून अॅपल कंपनी लवकरच आपली अॅपल पे ही डिजीटल पेमेंट सिस्टीम भारतात सादर करण्याची शक्यता आहे. अॅपल पे ही पेटीएम आणि सॅमसंग पे यांच्याप्रमाणे कॉन्टॅक्टलेस डिजीटल पेमेंट सिस्टीम आहे. यात युजर आपल्या क्रेडीट वा डेबिट कार्डाच्या मदतीने विविध प्रकारचे व्यवहार अगदी सुलभपणे करू शकतो. अर्थात यासाठी अॅपल पे प्रणालीच्या प्रोसेसींगसाठी आवश्यक असणार्या उपकरणाची आवश्यकता लागते. या प्रणालीच्या मदतीने कुणीही आपल्या क्रेडीट वा डेबिट कार्डचा थेट उपयोग न करतांनाही विविध प्रकारचे ट्रान्जेक्शन्स करू शकतो. यासाठी टच आयडी आणि फेशियल रेकग्नीशन प्रणालीचा पासवर्ड म्हणून उपयोग करण्यात येतो.
अॅपल पे ही प्रणाली जगातील अनेक देशांमध्ये आधीच सादर करण्यात आली आहे. आयफोन ६ आणि त्यावरील सर्व आवृत्त्यांमध्ये अॅपल पे वापरणे शक्य आहे. याशिवाय आयपॅड, अॅपल स्मार्टवॉच, मॅकबुक प्रो तसेच अलीकडेच जाहीर झालेल्या आयफोन-एक्स, आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस या तिन्ही मॉडेल्समध्येही याचा वापर शक्य आहे. हे मॉडेल्स लवकरच भारतीय ग्राहकांना सादर करण्यात येणार आहेत. यानंतर लागलीच अॅपल पे प्रणालीसही अधिकृतपणे भारतात लाँच करण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत. यासाठी अॅपल कंपनीने एचडीएफसी, स्टँडर्ड अँड चार्टर्ड बॅक, सिटी बँक आदी बँकांसह स्टारबक्स, क्रोमा स्टोअर्स आदी शॉपीजसोबत बोलणी सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. अर्थात यामुळे येत्या काही दिवसांमध्येच अॅपल पे सिस्टीम भारतात लाँच होणार असल्याचे अधोरेखित झाले आहे.