अमेरिकेची कंपनी अॅप्पल चीनला मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. कंपनीने चीनमधील iPhone चे उत्पादन नुकतेच कमी करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे येत्या काळात हे उत्पादन भारतात सुरु केले जाणार आहे. यातच आणखी एक भारतासाठी आनंदाची बाब आहे. अॅप्पल AirPods आणि Beats हेडफोन्सचे उत्पादन भारतात हलविण्याची शक्यता आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सने निक्केईच्या एका अहवालाचा हवाला दिला आहे. Apple ने पुरवठादारांना एअरपॉड्स आणि बीट्स हेडफोन्सचे बहुतांश उत्पादन भारतात हलवण्यास सांगितले आहे. देशात आयफोनची निर्मिती करणारी फॉक्सकॉन भारतातच बीट्स हेडफोन तयार करण्याच्या तयारीत असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. या गोष्टींशी संबंधीत दोन व्यक्तींचा हवाला देण्यात आला आहे.
यामुळे जागतिक पुरवठा साखळी वाढणार असून भारतासाठी ही मोठी घटना असेल. सध्या चीन आणि व्हिएतनाममध्ये एअरपॉड्सचे उत्पादन करणारी लक्सशेअर प्रिसिजन इंडस्ट्री ही कंपनी भारतातही अॅप्पलला मदत करणार आहे. फॉक्सकॉनने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. Apple ने 2017 मध्ये छोटा सप्लायर विस्ट्रॉनसोबत आयफोनचे उत्पादन भारतात सुरू केले होते. कंपनीचा नवीनतम आयफोन 14 सीरीज देखील देशात तयार केला जाईल.
यापूर्वी कंपनी भारतात उत्पादन करण्याचा आणि स्थानिक बाजारपेठेला पुरवठा करण्याचा विचार करत होती. आता कंपनी भारताला उत्पादन बेस वाढविण्याचा विचार करत असून ही उत्पादने युरोपसह अन्य बाजारपेठांमध्येही निर्यात केली जाणार आहेत.