५-जी तंत्रज्ञानामुळे देशातील दूरसंचारक्षेत्रात येत्या काही दिवसांत मोठी क्रांती होणार आहे. वेगवान ५-जीमुळे महिनाभरात होणारा डेटाचा वापर येत्या पाच वर्षांत तब्बल दुपटीने वाढणार आहे, असा अंदाज नोकिया कंपनीने अहवालात वर्तवला आहे. रिलायन्स जिओने सप्टेंबर २०१६ मध्ये अत्यंत स्वस्तातील डेटा प्लान आणले. २०१८ मध्ये डेटाचा वापर महिन्याला प्रतिव्यक्ती ९.७ जीबी इतका होता. तो २०२२ मध्ये प्रतिव्यक्ती १९.५ जीबी इतका झाला. हाच वापर येत्या पाच वर्षांत तब्बल १३६ टक्क्यांनी वाढून महिन्याला ४६ जीबी इतका होईल, असा अंदाज आहे.
कशामुळे मिळाला बूस्ट?
२०२२ मध्ये देशातील डेटाचा वापर प्रामुख्याने ४-जी तंत्रज्ञानाच्या आधारे होत होता. आता मात्र सर्व सेवा, ॲप्लिकेशन्स ५-जीवर चालणाऱ्या आहेत. गेल्या काही दिवसांत तब्बल ३१ कोटी युजर्स २-जी वरून ४-जीध्ये अपग्रेड झाले. हे अपग्रेडेशन यापुढे आणखी वेगाने होणार आहे. ५-जी सेवा पुरवण्याचा परवाना अनेक खासगी कंपन्यांना दिला आहे. येणाऱ्या महसुलातील ४० टक्के कमाई खासगी कंपन्यांच्या माध्यमातून मिळणार आहे. ही सेवा देण्यासाठी २०२७ पर्यंत देशात २००० विविध ठिकाणी खासगी कंपन्या तब्बल २४ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. येत्या काळात वाहतूक, आरोग्य आदी क्षेत्रांमध्ये वायरलेस नेटवर्कवर खूप भर दिला जाणार आहे.