इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप गेल्या तासाभरापासून बंद आहे. युजर्सना अॅपवर 'कनेक्टिंग' लिहिलेलं दिसत आहे. त्यामुळे ते कोणालाही मेसेज पाठवू शकत नाहीत. दुपारी 12 वाजल्यापासून युजर्सना ही अडचण येत असून ते कोणत्याही पर्सनल किंवा ग्रुपवर मेसेज पाठवू शकत नाहीत. व्हॉट्सअॅपच्या मालकीची कंपनी मेटाने याबाबत आता माहिती दिली आहे. "काही युजर्सना मेसेज पाठवण्यात समस्या येत आहेत. आम्ही ती समस्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी काम करत आहोत" असं म्हटलं आहे.
मेटाची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपच्या सेवांमध्ये सध्या व्यत्यय येत आहे. मेटा प्रवक्त्यांनी कंपनी शक्य तितक्या लवकर सर्व्हिस रिस्टोर करण्यासाठी काम करत आहे असं म्हटलं आहे. तसेच "आम्हाला माहिती आहे की सध्या काही लोकांना मेसेज पाठवण्यात समस्या येत आहेत आणि आम्ही शक्य तितक्या लवकर प्रत्येकासाठी व्हॉट्सअॅप रिस्टोर करण्यासाठी काम करत आहोत" असं देखील प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
WhatsApp झालं डाऊन, युजर्सना मोठा फटका
व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. आपल्या युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअॅप सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. अनेकांना व्हॉट्सअॅप शिवाय करमत देखील नाही. फोटो, व्हिडीओ आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी व्हॉट्सअॅपवरून सहज शेअर करता येतात. मात्र गेल्या तासाभरापासून देशभरात व्हॉट्सअॅप डाऊन झालं आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याचं म्हटलं जात आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप आणि पर्सनलवर देखील यामुळे मेसेजेस पाठवता येत नसल्याचं समोर आलं आहे. अनेकांनी याबाबत ट्विट केलं आहे. व्हॉट्सअॅपच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र यासंदर्भात व्हॉट्सअॅपकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. व्हॉट्सअॅप पुन्हा नेमकं कधी सुरू होणार याबाबत युजर्सकडून विचारणा करण्यात येत आहे. व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यानंतर आता ट्विटरवर मीम्स देखील व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"