असुस कंपनीने खास गेमर्ससाठी विकसित केलेला आरओजी स्ट्रीक्स जीएल७०२झेडसी हा लॅपटॉप भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
पीसी व लॅपटॉप गेमिंगच्या क्षेत्रात असुस कंपनी भारतीय बाजारपेठेत पहिल्या क्रमांकावर असल्याचे ताज्या आकडेवारीतून समोर आले आहे. असुसने गेमिंग लॅपटॉप, संगणक आणि मॉनिटर्सच्या उत्पादनात तब्बल २५.४ टक्के बाजारपेठेवर कब्जा केला आहे. या पार्श्वभूमिवर, असुसने पुन्हा एकदा खास गेमर्ससाठी आरओजी स्ट्रीक्स जीएल७०२झेडसी हा लॅपटॉप लाँच केला आहे. हा कंपनीच्या रिपब्लीक ऑफ गेमर्स म्हणजेच आरओजी या मालिकेतील नवीन लॅपटॉप होय. याचे मूल्य १,३४,९०० रूपये असून फ्लिपकार्टवरून याची विक्री-पूर्व नोंदणी सुरू झाली आहे. प्रत्यक्षात हे मॉडेल ग्राहकांना २० मार्चपासून मिळणार आहे.
आरओजी स्ट्रीक्स जीएल७०२झेडसी या मॉडेलमध्ये १७.३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी (१९२० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा अँटी ग्लेअर या प्रकारातील आयपीएस डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात अतिशय गतीमान असा ऑक्टा-कोअर रायझेन ७ हा प्रोसेसर दिलेला असून याला ४ जीबी व्हिडीओ रॅम असणार्या एएमडी रेडॉन आरएक्स-५८० ग्राफीक प्रोसेसरची जोड देण्यात आली आहे. याची रॅम १६ जीबी असून ती ३२ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. तर यात १ टेराबाईटपर्यंत स्टोअरेजचे पर्याय असतील. यात अतिशय उत्तम दर्जाचा ब्लॅकलिटी कि-बोर्ड दिलेला आहे. यामध्ये ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, युएसबी ३.०, युएसबी टाईप-सी, एचडीएमआय, हेडफोन जॅक आदी फिचर्स दिलेले आहेत.