मुंबई - असुस कंपनीने आपल्या ‘रिपब्लीक ऑफ गेमर्स’ म्हणजेच ‘आरओजी’ या मालिकेत दोन गेमिंग लॅपटॉप भारतीय बाजारपेठत उतारण्याची घोषणा केली आहे. असुसने अलीकडच्या काळात ‘रिपब्लीक ऑफ गेमर्स’ या मालिकेत विविध मॉडेल्स सादर केले आहेत. यात आता आरओजी स्ट्रीक्स जीएल५०३ आणि आरओजी जीएक्स५०१ या दोन नवीन मॉडेल्सची भर पडणार आहे. या दोन्ही माॅडेल्सच्या विविध व्हेरियंटचे मूल्य अनुक्रमे १,०९,९९० आणि २९९,९९० रूपयांपासून सुरू होणारे आहे. यांची फ्लिपकार्टसह क्रोमा व असुस स्टोअर्समधून नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
असुस आरओजी स्ट्रीक्स जीएल५०३ या लॅपटॉपमध्ये १५.६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी (१९२० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात इंटेलचा आठव्या पिढीतला अतिशय गतीमान असा कोअर आय७ प्रोसेसर देण्यात आला असून याला एनव्हीडीया जी-फोर्स जीटीएक्स १०५०टीआय या ग्राफीक प्रोसेसरची जोड देण्यात आली आहे. याची रॅम १६ जीबी असून स्टोअरेजसाठी १ टेराबाईटपर्यंतचे पर्याय आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यात युएसबी ३.१, युएसबी टाईप-सी, एचडीएमआय २.०, २-इन-१ कार्ड रीडर आदी फिचर्स देण्यात आले आहेत.
असुस आरओजी जीएक्स५०१ (झिफुरस) हा सुपर स्लीम या प्रकारातील लॅपटॉप आहे. याची जाडी फक्त १७.९ मिलीमीटर इतकी आहे. यातदेखील इंटेलचा आठव्या पिढीतील कोअर आय७ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. तर उत्तम दर्जाच्या ग्राफीक्ससाठी यामध्ये एनव्हिडीयाचा जीफोर्स जीटीएक्स१०८० (मॅक्स-क्यू) हा ग्राफीक प्रोसेसर असेल. यामध्ये १५.६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी (१९२० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले आहे. यातदेखील रॅम १६ जीबी असून स्टोअरेजसाठी १ टेराबाईटपर्यंतचे पर्याय आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यात युएसबी ३.१, युएसबी टाईप-सी, एचडीएमआय २.०, थंडरबोल्ट ३, २-इन-१ कार्ड रीडर आदी फिचर्स देण्यात आले आहेत.