असुस कंपनीने ड्युअल कॅमेर्यांनी सज्ज असणारा असुस झेनफोन झूम एस हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना २६,९९९ रूपये मूल्यात सादर केला आहे.
असुस झेनफोन झूम एस याच्या मागच्या बाजूस प्रत्येकी १२ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एकात एफ/१.७ अपार्चर आणि २५मीमी वाईड अँगल प्रदान लेन्स करण्यात आली आहे. तर दुसर्यात ५९ मीमी वाईड अँगल लेन्ससह २.३एक्स इतका ट्रु ऑप्टीकल तर एकंदरीत १२एक्स इतका ऑप्टीकल झूम देण्यात आला आहे. या कॅमेर्यांमध्ये ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन हे दोन विशेष फिचर्स असतील. यांच्या मदतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करणे शक्य आहे. याशिवाय यात ड्युअल पिक्सल पीडीएएफ, लेसर ऑटो-फोकस, सबजेक्ट ट्रॅकींग ऑटो-फोकस आदी फिचर्स असतील. असुस कंपनीने या कॅमेर्यांमध्ये ‘सुपर पिक्सल’ या विशेष तंत्रज्ञानाचा वापरदेखील केला असून यामुळे कमी उजेड वा रात्रीच्या वेळी चांगल्या दर्जाच्या प्रतिमा काढता येणार आहेत. असुस झेनफोन झूम एस या मॉडेलमधील कॅमेरा हा आयफोन ७ प्लस या मॉडेलमधील कॅमेर्यापेक्षा २.५ पटींनी तर अन्य सर्वसामाधारण मॉडेल्सच्या कॅमेर्यांपेक्षा तब्बल १० पटींनी उजेडाबाबत संवेदनाक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा देण्यात आला असून यात सोनी आयएमएक्स२१४ हा सेन्सर, एफ/२.० अपार्चर व स्क्रीन फ्लॅशची सुविधा असेल.
असुस झेनफोन झूम एस या स्मार्टफोनची बॉडी अतिशय दर्जेदार मेटलपासून तयार करण्यात आली आहे. यात ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा २.५ डी अमोलेड डिस्प्ले असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ५चे संरक्षक आवरण असेल. हे मॉडेल क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन ६२५ या प्रोसेसरने सज्ज असेल. याची रॅम चार जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने तब्बल दोन टिबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ६.० मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारे असून यावर असुस कंपनीचा झेन युआय ३.० हा युजर इंटरफेस असेल. या मॉडेलला लवकरच नोगट या आवृत्तीचे अपडेट मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या मॉडेलमध्ये तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून याच्या मदतीने तब्बल ६.४ तासांपर्यंत फोर-के क्षमतेच्या व्हिडीओचे चित्रीकरण करता येत असल्याचा दावा असुस कंपनीने केला आहे. भारतात हे मॉडेल नेव्ही ब्लॅक आणि ग्लेशियर सिल्व्हर या दोन रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.