गुगल प्ले स्टोअरवर आता ऑडिओबुक्स उपलब्ध करण्यात आले असून या माध्यमातून अमेझॉनला तगडे आव्हान उभे करण्याची तयारी गुगलने केल्याचे दिसून येत आहे. जगभरात ऑडिओबुक्स मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. विशेष करून अलिकडच्या काळात आपल्याकडेही पॉडकास्ट व ऑडिओ स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा प्रकार लोकप्रिय होऊ लागला आहे. आजवर ऑडिओबुक्सच्या विक्रीत अमेझॉन आघाडीवर आहे. या शॉपिंग पोर्टलवर यासाठी स्वतंत्र विभागदेखील देण्यात आला आहे. मात्र आता गुगल प्ले स्टोअरवरही ऑडिओबुक्स मिळणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबतचे प्रमोशन गुगल प्ले स्टोअरवर सुरू झाले होते. तर आता हा विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे.
दरम्यान, ऑडिओबुक विभाग सुरू करतांना गुगलने आपल्या युजर्ससाठी घसघशीत डिस्काऊंट देऊ केला आहे. याच्या अंतर्गत अनेक लोकप्रिय टायटल्स सवलतीच्या दरात खरेदी करता येणार आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे अगदी कुणी गुगल प्ले स्टोअरवर साइन-अप केले नसले तरीही ऑडिओबुक खरेदी करणे शक्य आहे. तसेच युजर कोणतेही बुक खरेदी करण्याआधी याचा प्रिव्ह्यू ऐकू शकणार आहे. ही सुविधा अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालींसह वेबवरही उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच गुगल होम हा स्मार्ट स्पीकरच्या माध्यमातूनही ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. अर्थात अॅप्स, चित्रपट, दूरचित्रवाणी कार्यक्रम आदींसोबत आता गुगल प्ले स्टोअरवरून ऑडिओबुक्सही मिळणार आहेत. या या माध्यमातून अमेझॉनला गुगल तगडे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळात गुगल आणि अमेझॉन या कंपन्यांमधील स्पर्धा अगदी टोकाला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर, गुगलने ऑडिओबुक्सच्या विक्रीत पदार्पण केल्याचे मानले जात आहे.