बंगळुरू - येत्या तीन ते पाच वर्षांत आरपीए फर्म ऑटोमेशन एनिवेअर (Automation Anywhere) भारतात 100 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीची मदत भारतात डिजिटल वर्कफोर्स तयार करण्यासाठी होणार आहे. तसेच, भारतातील महत्वाची शहरे असलेल्या दिल्ली, हैदराबाद, चेन्नई आणि पुणे या चार ठिकाणी ऑटोमेशन एनिवेअर नवीन कार्यालये उघडणार आहे. सध्या ऑटोमेशन एनिवेअरची बंगळुरूमध्ये दोन आणि बडोदामध्ये एक अशी एकूण तीन अभियांत्रिकी केंद्र आहेत.
ऑटोमेशन एनिवेअरकडून आशियातील आरपीए डेव्हलपर्स, आयटी व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन 27 आणि 28 ऑगस्ट रोजी बंगळुरूमध्ये करण्यात आले होते. यावेळी आरपीए (Robotic Process Automation) आणि सॉफ्टवेअर बोट्स (Software bots) संदर्भात माहिती देण्यात आली.
आरपीएने भारतात अधिक संशोधन आणि विकास केंद्रे स्थापन करण्यासाठी आणि ऑटोमेशनला चालना देण्यासाठी भागीदार इकोसिस्टम तयार करण्याबरोबरच ऑटोमेशनमध्ये अधिकाधिक लोकांना प्रशिक्षण देण्यावर भर दिला आहे. ऑटोमेशन एनिवेअरची 35 हून अधिक देशांमध्ये कार्यालये आहेत. 3100 पेक्षा अधिक ग्राहक आहेत तर 1800 हून अधिक इंटरप्राईज ब्रँड आणि 800 पार्टनर्स आहेत.
ऑटोमेशन एनिवेअर विद्यापीठातून 350,000 हून अधिक लोकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. 300 पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था आहेत. आरपीए उद्योगाच्या वाढीमुळे अत्यंत कुशल डेव्हलपर्सना नवीन आणि नाविन्यपूर्ण बुद्धिमान ऑटोमेशन क्षमता देण्याची जागतिक स्तरावर मोठी मागणी निर्माण झाली आहे. जागतिक स्तरावर आयोजित करण्याच्या अनेक लाईव्ह व ऑनलाईन कार्यक्रमांपैकी हा एक कार्यक्रम आहे. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ट्रॅव्हल्सला गती देण्यासाठी उद्योजकांना एक योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.